बिस्लेरीच्या पाण्यावरून ट्रोल झालेल्या जान्हवी किल्लेकरने व्हिडीओतून दिले उत्तर
कोल्हापूरला गेल्यावर बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करत असल्याच्या वक्तव्यावरून झालेल्या टीकेला अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने व्हिडीओ शेअर करून उत्तर दिले.
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कोल्हापूरला गेल्यावर आपण बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ करतो, असं तिने सांगितलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता जान्हवीने एक व्हिडीओ शेअर करून आपली बाजू मांडली आहे. त्यात तिने आपल्या त्वचेला झालेल्या त्रासाचे फोटोही दाखवले आणि त्यामागचं कारण सांगितलं.
ट्रोलिंगबद्दल जान्हवीने व्हिडीओमध्ये नाराजी व्यक्त केली. चार व्ह्यूज, लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी एखाद्या महिलेचा अपमान करणं योग्य नाही, असं तिने म्हटलं. ती म्हणाली, "आपल्या समाजात माणुसकी ढासळत चालली आहे. चार व्ह्यूज वाढवण्यासाठी, चार लाईक, फॉलोअर्स वाढवण्यासाठी एखाद्या स्त्रीचा कितीही अपमान केला तरी चालतो. ज्या ज्या लोकांनी माझ्या नावाने व्हिडीओ बनवले आहेत, त्यांचे मनापासून आभार."
बिस्लेरीच्या वादाबद्दल बोलताना ती म्हणाली, "तुम्ही फक्त रील बघता, जी ३० सेकंदांची असते, ६० सेकंदांची असते. त्याच्यात हे अर्धसत्य आहे. पण त्यासाठी तुम्हाला पूर्ण पॉडकास्ट पाहायला लागेल. कारण त्या पॉडकास्टमध्ये मी खूप स्पष्टपणे म्हटलंय की, मी शूटिंगसाठी जेव्हा जेव्हा कुठे आउटडोअरला जाते, त्यावेळी मला या गोष्टी कराव्या लागतात."
त्वचेला नेमका काय त्रास झाला होता, हेही जान्हवीने सविस्तर सांगितलं. २०१९-२० मध्ये एका मालिकेच्या शूटिंगसाठी ती मुंबईबाहेर एका ठिकाणी राहत होती. तेव्हा हा त्रास सुरू झाला, असं तिने सांगितलं. ती म्हणाली, "मी छान अशा स्किनने त्या मालिकेच्या शूटिंगसाठी गेले होते. पण महिनाभरात माझा फेस पूर्ण पिंपल्सने भरला."
त्यानंतर तिने उपचार घेतले आणि तिथल्या स्थानिक डॉक्टरांचा सल्लाही घेतला. पाण्यामुळे त्वचेची समस्या होत असण्याची शक्यता डॉक्टरांनी बोलून दाखवली, असं जान्हवीने सांगितलं. तिथलं पाणी तिला सूट होत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं, असंही ती म्हणाली. असा त्रास फक्त सेलिब्रिटींनाच नाही, तर कोणालाही होऊ शकतो, असं तिने स्पष्ट केलं. "आपल्याला कधी कधी तिथलं पाणी सूट होत नाही, ही खरी गोष्ट आहे. ही फक्त सेलिब्रिटींना लागू होत नाही, अभिनेत्रींनाच लागू होत नाही, हे सगळ्यांना लागू होतं. मी फार स्पष्ट बोलते ना, हा माझा प्रॉब्लेम आहे," असं ती म्हणाली.
स्किनच्या त्रासाचे फोटो दाखवत तिने सांगितलं की, त्या काळात मेकअपने डाग आणि पिंपल्स झाकण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही, असं तिने म्हटलं.
या त्रासानंतर त्वचेच्या उपचारांवर मोठा खर्च केल्याचा दावा जान्हवीने केला. अभिनेत्री म्हणून चांगलं दिसणं गरजेचं असतं, म्हणून हे सगळं केलं, असं ती म्हणाली. "त्याच्यानंतर मी माझ्या स्किनसाठी लाखो रुपये मोजलेले आहेत. माझी ऐपत नसताना सुद्धा. का तर मी एक अभिनेत्री आहे आणि मला छान दिसायचंय आणि त्याच्यामुळे मी या गोष्टी पाळते."
बिस्लेरीच्या पाण्यावरून झालेल्या टीकेवर तिने प्रश्न विचारला, "बिस्लेरीची बाटली किती रुपयांना मिळते ती? ६०-७० रुपयाला? ५० रुपयाला ती बाटली मिळते बिस्लेरीच्या पाण्याची. त्यात काय एवढं महाग आणि काय खर्चिक केलं मी?"
आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असं जान्हवीचं म्हणणं आहे. कोल्हापूरच्या पाण्याबद्दल आपण वाईट बोललो नाही, असं तिने सांगितलं. "राहिला प्रश्न कोल्हापूरच्या पाण्याचा, तर कोल्हापूरचं पाणी चांगलंच आहे. हे मी त्या व्हिडीओमध्ये सुद्धा बोललेली आहे," असं ती म्हणाली.
व्हिडीओच्या शेवटी तिने आपली भूमिका आणखी ठामपणे मांडली. आपण चुकीचं बोलल्याचं सिद्ध झालं, तर माफी मागायला तयार असल्याचं तिने म्हटलं. "सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी काहीही चुकीचं बोललेली नाहीये. जर मी चुकीचं बोलले असते तर अख्ख्या कोल्हापूरचे, अख्ख्या महाराष्ट्राचे मी पाय धरून माफी मागायला सुद्धा तयार आहे. तेवढी माझी ताकद आहे. पण मी एकही वाक्य चुकीचं बोललेली नाहीये."
पुढे ती म्हणाली, "मीसुद्धा महाराजांचीच मुलगी आहे. त्याच्यामुळे मी मोडेन पण मी वाकणार नाही. जर मी चुकीचं बोलले असेन तर मी १०० वेळा माफी मागेन. पण जर मी चुकलेले नाहीये तर ते सॉरी बॉस, मी नाही माफी मागणार." शेवटी कोल्हापूरच्या आईकडे प्रार्थना करत ती म्हणाली, "कोल्हापूरची आई तुम्हाला सद्बुद्धी देवो, हीच आईकडे प्रार्थना करेन मी."
जान्हवीच्या या स्पष्टीकरणानंतर बिस्लेरीच्या पाण्यावरून सुरू झालेल्या वादाला आता नवं वळण मिळालं आहे.