एकटेपणा वाढतोय, तरीही नाती हवीत; भारतातील तरुणांबाबत मॅच ग्रुपच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष
कामाचा ताण आणि डिजिटल कनेक्शन असूनही भारतातील तरुण अविवाहित व्यक्तींना एकटेपणा जाणवतोय, असं मॅच ग्रुप आणि इप्सॉसच्या सर्वेक्षणात समोर आलंय.
आजकालच्या धावपळीच्या आणि डिजिटल पद्धतीने जोडलेल्या जगात अर्थपूर्ण नाती जोडणं तरुणांसाठी आधीपेक्षा जास्त अवघड होत चाललंय. फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण आशियात आधुनिक जीवनशैलीमुळे अविवाहित तरुणांना हवी तशी नाती तयार करणं कठीण जातंय. भारतात लोकांपर्यंत पोहोचणं किंवा ओळख होणं ही अडचण नाहीये, तर खरं आव्हान आहे ते म्हणजे या धावपळीच्या आणि ऑनलाइन कनेक्टेड जगात मनापासून वाटणारं नातं शोधणं.
भारतातील तरुण अजूनही सामाजिक आणि रोमँटिक नात्यांच्या शोधात आहेत. पण कामाचा ताण, थकवा आणि ऑनलाइन बोलणं व प्रत्यक्ष आयुष्यातलं नातं यांच्यातलं वाढतं अंतर यामुळे खरा आपलेपणा जाणवणं कठीण होतंय.
हे नेमकं समजून घेण्यासाठी मॅच ग्रुपने इप्सॉस या संस्थेला काम दिलं होतं. भारतातील तरुण अविवाहित व्यक्तींना एकटेपणा, सामाजिक नाती, रिलेशनशिप आणि डेटिंगबाबत कसं वाटतं, यावर इप्सॉसने संशोधन केलं. यातून एक विरोधाभास समोर आला. भारतातील तरुण नाती जोडण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करतायत, पण लोकांच्या सहवासात राहणं किंवा डिजिटली कनेक्टेड असणं म्हणजे एकटेपणा कमी होणं, असं नाही. अनेकांना गरज आहे ती नवीन लोकांना भेटण्याच्या वेगळ्या पद्धतींची आणि कमी पण घट्ट व अर्थपूर्ण नात्यांची.
१८ ते ४५ वयोगटातील १,००० अविवाहित व्यक्तींवर करण्यात आलेल्या मॅच ग्रुप ह्युमन कनेक्शन सर्वेक्षणानुसार, भारतातील ३५ टक्के अविवाहित लोकांना नेहमी किंवा वारंवार एकटेपणा जाणवतो. तरीही ७० टक्के लोक नवीन सामाजिक नाती जोडण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत आणि ७५ टक्के लोक आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा प्रत्यक्ष भेटून बोलतात. म्हणजेच ही समस्या नाती जोडण्याची इच्छा किंवा संधी नसण्याची नाही, तर आजच्या आयुष्यातला वाढता ताण याला कारणीभूत आहे.
६४ टक्के अविवाहित लोक सांगतात की ते सामाजिक आयुष्यापेक्षा काम किंवा अभ्यासाला जास्त महत्त्व देतात, तर ५५ टक्के लोकांना रोजच्या कामानंतर इतका थकवा येतो की त्यांना लोकांना भेटणं किंवा बोलणं जमत नाही. ५८ टक्के लोक म्हणतात की ते ऑनलाइन लोकांशी कनेक्टेड असले तरी प्रत्यक्ष आयुष्यात एकटेपणा वाटतो. यातून डिजिटल कनेक्शन आणि खऱ्या आयुष्यातलं नातं यातला फरक स्पष्ट होतो. तरीही नाती जोडण्याची इच्छा कमी झालेली नाही. ७२ टक्के लोक जास्त नाती जोडण्यापेक्षा घट्ट नाती जोडण्याला प्राधान्य देतात, तर ७० टक्के लोक नवीन सामाजिक संबंध बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ७८ टक्के लोकांचा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे, तर ७७ टक्के लोकांना वाटतं की त्यांना योग्य जोडीदार नक्की सापडेल. ८५ टक्के लोक दीर्घकालीन नात्याच्या शोधात आहेत, आणि जेन झी मध्ये हे प्रमाण ८९ टक्के इतकं आहे.
६३ टक्के लोक चुकीच्या जोडीदारासोबत तडजोड करून राहण्यापेक्षा शोध सुरू ठेवणं पसंत करतील, तर ७२ टक्के लोक दीर्घकालीन भविष्य दिसणाऱ्या व्यक्तीसोबतच डेटिंग करणं पसंत करतील.
मॅच ग्रुपचे भारत आणि मिडल ईस्टचे रिजनल हेड व सीनियर डायरेक्टर अनुकुल कुमार म्हणाले, "भारतातील तरुणांना काय हवंय हे माहीत आहे. या संशोधनातून समोर आलं की भारतातील ३५ टक्के अविवाहित लोकांना वारंवार किंवा नेहमी एकटेपणा वाटतो, तरीही ७० टक्के लोक नवीन सामाजिक नाती जोडण्यासाठी सक्रिय आहेत आणि ७२ टक्के लोक कमी पण जास्त घट्ट नात्यांना प्राधान्य देतात. व्यस्त आयुष्य आणि डिजिटल संवादामुळे खरी नाती जोडणं अवघड होत असलं, तरी अर्थपूर्ण नात्याची इच्छा अजूनही तितकीच आहे. टेक्नॉलॉजी लोकांना खरी, जुळणारी आणि अर्थपूर्ण नाती शोधून देण्यात मोठी भूमिका बजावू शकते."
सध्या भारतातील ४० टक्के अविवाहित लोक डेटिंग अॅप्स वापरतात, तर ६३ टक्के लोकांना वाटतं की डेटिंग अॅप्समुळे इतरांशी जोडलेलं वाटतं आणि एकटेपणा कमी होतो. ५५ टक्के लोक पुढच्या १२ महिन्यांत डेटिंग अॅप वापरण्याची शक्यता वर्तवतात, तर ६० टक्के लोकांना ऑनलाइन डेटिंगचा अनुभव उत्साहवर्धक वाटतो.
६० टक्के अविवाहित लोक ऑनलाइन डेटिंग करताना सुरक्षितता आणि समावेशकतेचा विचार करतात, तर ५२ टक्के लोकांसाठी डेटिंग अॅप निवडताना पडताळणी केलेली प्रोफाइल्स आणि मजबूत सुरक्षा व्यवस्था हे महत्त्वाचे मुद्दे ठरतात. यावरून दिसतं की केवळ डिजिटली कनेक्ट होण्यापलीकडे खऱ्या अर्थपूर्ण नात्यासाठी टेक्नॉलॉजीची भूमिका अधिक व्यापक होत चाललीय.
इप्सॉसने भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि थायलंडमध्ये मॅच ग्रुप ह्युमन कनेक्शन सर्वेक्षण केलं. भारतात प्रमुख महानगरं आणि टियर वन शहरांमधील १८ ते ४५ वयोगटातील १,००० अविवाहित व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं.