लग्न झालेल्या लेकीला माहेरहून या 5 वस्तू देणं टाळा, वास्तुशास्त्र काय सांगतं
मुलीचं लग्न झाल्यावर ती सासरी जाते, तेव्हा आई-वडील तिला रिकाम्या हातांनी पाठवत नाहीत. पण वास्तुशास्त्र आणि जुन्या मान्यतांनुसार काही वस्तू लेकीला माहेरहून देणं टाळायला हवं, त्या कोणत्या ते पाहूया.
लग्नानंतर मुलगी सासरी राहायला जाते, आणि ती जेव्हा माहेरी येते तेव्हा आई-वडील तिला रिकाम्या हातांनी परत पाठवत नाहीत. लोणचं, पापड, कपडे अशा वस्तू मायेपोटी तिला दिल्या जातात. पण वास्तुशास्त्र आणि जुन्या लोकांच्या मान्यतेनुसार काही ठराविक वस्तू लेकीला सासरी जाताना देणं टाळलं पाहिजे, असं म्हटलं जातं.
पहिली गोष्ट म्हणजे चाकू, कात्री यासारख्या धारदार वस्तू. नवीन संसार थाटताना अनेकदा घरातून मुलीला चाकू किंवा धारदार भांडी दिली जातात, पण वास्तुशास्त्रानुसार हे टाळायला हवं. धारदार वस्तू दिल्यानं नात्यात दुरावा येतो अशी मान्यता आहे. अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि नवरा-बायकोमध्ये किंवा सासू-सुनेमध्ये गैरसमज तयार होतात, असं सांगितलं जातं. त्यामुळे या वस्तू माहेरहून देण्याऐवजी तिने सासरी स्वतः विकत घेतलेल्या बऱ्या असतात.
दुसरी गोष्ट म्हणजे गॅस शेगडी किंवा आगीशी संबंधित कोणतीही वस्तू. पूर्वीच्या काळी लेकीला निरोप देताना चूल किंवा शेगडी देण्याची पद्धत होती, पण आता असं मानलं जातं की माहेरहून गॅस शेगडी, लायटर किंवा आगीशी निगडित वस्तू देऊ नये. आगीचा संबंध भांडण आणि रागाशी जोडला जातो, त्यामुळे अशी वस्तू दिल्यास सासरी सतत तणाव आणि वाद होतात अशी मान्यता आहे.
तिसरी गोष्ट आंबट लोणचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी आलेल्या लेकीला आई प्रेमापोटी कैरीचं किंवा लिंबाचं लोणचं करून देते. पण वास्तुशास्त्रानुसार विवाहित मुलीला माहेरहून जास्त आंबट लोणचं देऊ नये असं सांगितलं जातं. आंबटपणाचा संबंध तिच्या सासरच्या नात्यांशी जोडला जातो, लोणचं जितकं आंबट तितका नात्यातला गोडवा कमी होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे लोणचं द्यायचं असेल तर थोडं द्या किंवा गोड लोणचं द्या, मोठा डबा भरून आंबट लोणचं देणं टाळा.
चौथी गोष्ट म्हणजे काटेरी झाडं. आजकाल वाढदिवसाला किंवा नवीन घरासाठी झाडं गिफ्ट देण्याची पद्धत आहे, पण लेकीला कॅक्टस किंवा काटे असलेलं कोणतंही झाड भेट म्हणून देऊ नये असं वास्तुशास्त्र सांगतं. काटेरी झाडांमुळे तिच्या घरात अशांतता येते आणि सतत टोचल्यासारखं वातावरण राहतं, घरात भांडणं वाढतात अशी मान्यता आहे. त्याऐवजी मनी प्लांट, तुळस किंवा गुलाबाचं रोप देणं शुभ मानलं जातं.
पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचे कपडे. काळा रंग अनेकींना आवडतो, पण शुभ कार्यात आणि खास करून माहेरहून मुलीला काही देताना काळ्या रंगाचे कपडे देऊ नयेत असं सांगितलं जातं. काळा रंग नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो आणि चांगल्या प्रसंगी बहुतेक वेळा अशुभ समजला जातो. त्यामुळे कपडे द्यायचे असतील तर लाल, हिरवा, पिवळा असे रंगीत कपडे द्यावेत, त्यानं नात्यातला गोडवा टिकून राहतो अशी मान्यता आहे.
धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्राशी संबंधित या माहितीचा उद्देश केवळ वाचकांना माहिती देणं इतकाच आहे. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.