बाईक चालवणाऱ्या मुंबईकर तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, पुरुषांच्या सभ्य वागण्याचं कौतुक
हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यात रस्त्यावरच्या पुरुषांच्या प्रतिक्रिया टिपणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात फिरतोय आणि त्यावरून पुन्हा एकदा मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा विषय चर्चेत आलाय.
देशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच ऐरणीवर असतो. कुठे ना कुठे रोज काहीतरी वाईट घडतं. पण याच पार्श्वभूमीवर मुंबईचं नाव मात्र वेगळं ठरतं. मुंबई महिलांसाठी सुरक्षित आहे, असं अनेकजण सांगतात. रात्री बारा वाजताही इथे मुली एकट्या रस्त्यावर फिरताना दिसतात. आधीही अनेक व्हिडिओंमध्ये मुलींनी स्वत: सांगितलं आहे की मुंबईत रात्रीच्या वेळीसुद्धा त्यांना भीती वाटत नाही. आता याच विषयाशी संबंधित एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, जो पाहून कोणालाही मुंबईचा अभिमान वाटेल.
deewithwingss या युजरनेमने ओळखल्या जाणाऱ्या तरुणीने हा व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती स्वत: बाईक चालवताना दिसते. आपल्याकडे मुली बहुतांश वेळा स्कूटी चालवतात, कारण ती चालवायला आणि वजनाने हलकी असते. बाईक चालवणाऱ्या मुली तुलनेने कमी दिसतात, त्यामुळे रस्त्यावर एखादी मुलगी बाईकवर दिसली की लोक तिच्याकडे बघतच राहतात, असा अनुभव तिने या व्हिडिओतून मांडला आहे.
तिने हाच अनुभव कॅमेऱ्यात टिपला. बाईक चालवताना समोरून येणारे आणि बाजूने जाणारे पुरुष तिच्याकडे कसे बघतात, काय प्रतिक्रिया देतात, हे सगळं तिने हेल्मेटला बसवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं.
आपल्याकडे अजूनही पुरुषप्रधान मानसिकता कायम आहे आणि मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, हे सर्वांना ठाऊक आहे. अनेक शहरांमध्ये एखादी मुलगी बाईक चालवत असेल, तर लोक वेगळ्याच नजरेने बघतात किंवा काहीतरी कमेंट करतात. पण या व्हिडिओत असं काहीही दिसत नाही. मुंबईतली मुलं त्या तरुणीकडे नव्हे, तर तिच्या बाईककडे बघत आहेत. कोणी लांबूनच हात दाखवून बाईक छान असल्याचं सांगतोय, कोणी बाईककडे बघून हसतोय, तर कोणी कौतुकाची पावती देतोय. एकही जण तिला त्रास देताना किंवा वाईट नजरेने बघताना दिसत नाही.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे मुंबईत मुलींनी बाईक चालवणं आता खूपच सामान्य बाब झाली आहे. लोकांना त्याचं आश्चर्यही वाटत नाही, उलट ते तिच्या धाडसाचं कौतुक करतात. हाच मुंबईचा खरा चेहरा आहे, असं म्हटलं जातंय. हा व्हिडिओ आतापर्यंत ११ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत. एका मुलीने लिहिलंय, "छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा, इथे संस्कारच तसे आहेत, जय महाराष्ट्र." दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, "माझा जन्म मुंबईतच झाला. मी कित्येक वर्षं नाईट शिफ्ट केली, पण मला कधीच त्रास झाला नाही. उलट काही अडचण आली तर पुरुषांनी मदतच केली. पहाटेपर्यंत पार्टी करून घरी जाताना कॅबवाला दारापर्यंत सुरक्षित सोडायचा. आमची मुंबईच भारी आहे." आणखी एका मुलीने लिहिलंय, "मी मेरठ, दिल्ली, लंडन आणि मुंबई सगळीकडे राहिली आहे. पण मुंबईसारखं शहरच नाही. १००% सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही, पण इतर शहरांच्या तुलनेत इथे खूपच कमी भीती वाटते."
एकूणच हा व्हिडिओ पाहून एकच जाणवतं, ते म्हणजे मुंबई अजूनही महिलांसाठी एक चांगलं आणि तुलनेने सुरक्षित शहर आहे आणि इथली माणसं मनाने खरोखर मोठी आहेत.