चालत्या ट्रेनखाली घसरलेल्या प्रवाशाला पोलीस कॉन्स्टेबलने खेचून वाचवले, अनंतपूर स्टेशनवरचा व्हिडिओ व्हायरल
अनंतपूर रेल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमध्ये चढताना घसरलेल्या कुमार यांना वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र यांनी शर्ट पकडून मागे ओढले. संपूर्ण प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर रेल्वे स्टेशनवर घडलेल्या एका प्रसंगाने तिथे उपस्थित असलेल्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सुरू झालेली ट्रेन पकडायला गेलेला एक प्रवासी काही सेकंदांतच मोठ्या संकटात सापडला. मात्र वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने वेळीच धाव घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला.
कधी कधी घाईगडबडीत आपणच आपला जीव धोक्यात घालतो आणि अशा वेळी काही माणसं देवदूतासारखी धावून येऊन प्राण वाचवतात, असं म्हटलं जातं. अनंतपूर स्टेशनवरचा हा प्रसंग नेमका तसाच होता.
ही घटना आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील भैरव नगर परिसरात राहणाऱ्या कुमार यांच्यासोबत घडली. गेल्या महिन्याच्या २९ तारखेला अनंतपूर रेल्वे स्टेशनवर ते चालत्या ट्रेनमध्ये चढायला गेले आणि घसरून पडले. मृत्यू अगदी जवळ येऊन परतला, असाच हा प्रसंग होता.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर शेअर झाले आहे आणि त्यात सगळा प्रकार स्पष्ट दिसतो. फुटेजमध्ये स्टेशनवरून ट्रेन निघालेली दिसते आणि त्याच वेळी एक जण धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. ट्रेन आधीच सुरू झालेली असल्यामुळे तिने काही सेकंदांत वेग पकडला. त्या वेळी तो माणूस ट्रेनसोबत प्लॅटफॉर्मवरून घरंगळत पुढे ओढला गेला.
पुढच्याच क्षणी तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्म यांच्यातल्या फटीत पडणार होता. नेमक्या त्याच वेळी तिथे असलेला पोलीस धावत आला. त्याने कुमार यांचा शर्ट पकडून त्यांना ओढत मागे खेचले. हे सगळे पाहून आजूबाजूच्या लोकांच्या अंगावर काटा आला.
वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र यांनी प्रसंगावधान दाखवून कुमार यांचे प्राण वाचवले. या धक्क्यातून सावरल्यानंतर कुमार लगेच कॉन्स्टेबलच्या पाया पडले आणि त्यांचे आभार मानले.
आजकाल प्रत्येक जण स्मार्टफोनच्या दुनियेत रमलेला असतो आणि आजूबाजूला काय चाललंय याकडे फारसं कुणाचं लक्ष नसतं. अशा वेळी मदतीची अपेक्षा करणंही अवघड वाटतं. तरीही काही माणसं फक्त व्हिडिओ काढत बसत नाहीत, तर मदतीसाठी हात पुढे करतात. सुरेंद्र यांनी तेच करून दाखवलं.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कॉन्स्टेबल सुरेंद्र यांचं मनापासून कौतुक होत आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
धावत्या ट्रेनमधून उतरणं किंवा त्यात चढणं आपल्यासाठी धोक्याचं ठरतं. कितीही उशीर होत असला तरी असं करणं टाळायला हवं. तुमची एक चूक तुमचा जीव घेऊ शकते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे घाई न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या.