शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

आर्वी न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने फेकली चप्पल, आरोपीवर गुन्हा दाखल

आर्वी न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने फेकली चप्पल, आरोपीवर गुन्हा दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

वर्धा जिल्ह्यातील आर्वी न्यायालयात हजर केलेल्या आरोपीने गुरुवारी न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्याने खळबळ उडाली. आर्वी पोलिसांनी कदीर अली रज्जाक अली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील न्यायालयात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला. न्यायालयात हजर केलेल्या आरोपीने अचानक न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्याची ही घटना आहे. दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान आर्वीतील न्यायालय क्रमांक २ मध्ये हा प्रकार घडताच तिथे मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणी आर्वी न्यायालयाचे सह अधीक्षक शैलेश अंबुलकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी आरोपी कदीर अली रज्जाक अली (वय ४४, रा. काकडधरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय झाले, ते असे: गुरुवारी दुपारी तळेगाव पोलिसांनी आरोपी कदीर अली याला आर्वीच्या न्यायालय क्रमांक २ मध्ये न्यायाधीश एन. जे. देशमुख यांच्यासमोर हजर केले होते. त्यावेळी तळेगाव श्यामजीपंत पोलीस स्टेशनच्या पीएसआय धनश्री सगणे, तसेच पोलीस कर्मचारी श्रीकांत नायकवाडे आणि अतुल अडसड हेही तिथे हजर होते.

न्यायाधीशांनी आरोपीला नाव विचारले, तेव्हा त्याने आपले नाव सांगितले. त्यानंतर त्याला एक-दोन प्रश्नही विचारण्यात आले. मग आरोपीने खिशातून एक कागद काढून खाली टाकला. तो कागद उचलण्यासाठी तो खाली वाकला आणि अचानक पायातली चप्पल काढून त्याने न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.

ही चप्पल तिथे उपस्थित असलेले सरकारी वकील के. व्ही. वेरूळकर यांना लागली. पोलीस आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याने दुसरी चप्पलही त्याच दिशेने, म्हणजे डायसकडे, फेकली. ती पंख्याला लागली आणि न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर जाऊन पडली. हे घडताच न्यायालयाच्या कक्षात एकच खळबळ उडाली. तिथे असलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

यापूर्वीही या आरोपीबाबत अशीच एक घटना समोर आली होती. २१ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी तळेगाव-श्यामजीपंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. तिथे त्याने महिला डॉक्टरला थापड मारली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

त्या घटनेची चर्चा थांबते न थांबते तोच आर्वी न्यायालयात चप्पल फेकल्याचा प्रकार समोर आला. दोन्ही वेळा पोलिसांच्या उपस्थितीतच आरोपीकडून अशा प्रकारचे वर्तन झाले, त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ