आरसीबीला धक्का, पहिल्या सामन्यापासून संघासोबत असलेले ड्रमवादक देवा यांचे निधन
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे ड्रमवादक देवा यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. कन्नडचा 'शिवमणी' म्हणून त्यांची ओळख होती.
आयपीएलमधील प्रसिद्ध संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) याला मोठा धक्का बसला आहे. संघाचे ड्रमवादक देवा यांचे निधन झाले आहे. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यापासून ते संघासोबत होते. रविवारी मध्यरात्री प्रदीर्घ आजारामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आरसीबीने सोशल मीडियावर देवा यांचे ड्रम वाजवतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. देवा खूप काळापासून संघासोबत होते. त्यांना एक आजार जडला होता आणि तो इतका वाढला की त्यातून ते बाहेर येऊ शकले नाहीत. देवा हे आरसीबी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग होते, असे आरसीबी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
व्यवस्थापनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, चिन्नास्वामी स्टेडियममधील पहिल्या सामन्यापासूनचे लक्षात राहतील असे क्षण असोत किंवा देवा यांचे ड्रमवादन असो, आरसीबीसाठी सामन्याच्या दिवशीच्या अनुभवाचा तो वेगवेगळा भाग राहिला आहे. रविवारी मध्यरात्री वयाच्या 64 व्या वर्षी आरोग्याशी संबंधित कारणांमुळे आपण देवा यांना गमावले, असेही त्यात म्हटले आहे.
देवा यांना प्रेमाने कन्नडचा 'शिवमणी' या नावाने ओळखले जायचे. त्यांच्या वाद्याचा आवाज चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नेहमी घुमत राहील आणि तो आरसीबीच्या लोकसाहित्याचाही भाग असेल, असे आरसीबीने म्हटले आहे. अनेक वर्षे आमचे मनोरंजन केल्याबद्दल धन्यवाद, आपल्या आत्म्यास शांती लाभो, अशा शब्दांत संघाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बंगळुरूने पहिले जेतेपद 2025 मध्ये जिंकले होते. तब्बल 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फ्रँचायझीने चषक जिंकला होता. हे रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली घडले. त्याआधी विराट कोहली यांच्यापासून अनेक दिग्गजांनी या फ्रँचायझीची धुरा सांभाळली होती, पण त्यांना संघाला जेतेपद मिळवून देता आले नाही.
पाटीदार यांच्या नेतृत्वाची कमाल तेवढ्यावरच थांबली नाही. त्यांच्या पुढच्या हंगामात म्हणजेच या वर्षी, 2026 मध्येही त्यांनी ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यामुळे फ्रँचायझीला आता सलग तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरायचे असेल. आता येत्या हंगामात गतविजेता म्हणून आरसीबी कशी कामगिरी करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.