आदिलाबादच्या रुग्णालयातील चार व्हेंटिलेटर चोरी: चंद्रपुरात संशयित ताब्यात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंचलेश्वर वार्ड परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले आणि तेलंगणा पोलिसांच्या पथकाच्या स्वाधीन केले.
तेलंगणातील आदिलाबाद येथील रुग्णालयातून चार व्हेंटिलेटर चोरीला गेल्याच्या प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या उपकरणांची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. संशयिताला चंद्रपुरातील अंचलेश्वर वार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला तेलंगणा पोलिसांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही चोरी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झाली होती. आदिलाबाद येथील राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, म्हणजेच 'रिम्स' (RIMS), या शासकीय रुग्णालयातील आरआयसीयू (RICU) तसेच सारी (SARI) आणि टीबी (TB) वॉर्डमधून हे चार व्हेंटिलेटर अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत सुमारे ५ लाख रुपये असून एकूण किंमत २० लाख रुपये होते. या चोरीमुळे वैद्यकीय वर्तुळात आणि प्रशासनात खळबळ उडाली होती.
या घटनेबाबत तेलंगणातील आदिलाबाद-२ (II) टाऊन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तांत्रिक आणि गोपनीय तपास सुरू केला. घटनास्थळावरील आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजचे बारकाईने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरात लपून बसला असून तिथेच राहत आहे.
या माहितीची खात्री पटताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने अंचलेश्वर वार्ड परिसरात सापळा रचला आणि सज्जन वसंत मोटे (वय ४५ वर्षे, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने 'रिम्स' रुग्णालयातून व्हेंटिलेटर चोरल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे.
आरोपीची ओळख पटल्यानंतर आणि कायदेशीर प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी त्याला आदिलाबाद (तेलंगणा) येथून आलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाच्या स्वाधीन केले. पुढील तपास आणि चोरीला गेलेला माल जप्त करण्यासाठी हे पथक त्याला घेऊन गेले आहे.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, इमरान खान, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, लालु यादव, तसेच पोलीस अंमलदार शशांक बादामवार आणि किशोर वाकाटे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. आंतरराज्यीय गुन्हेगाराला पकडण्यात चंद्रपूर पोलिसांना मिळालेले हे यश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.