मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 303 | Very Poor 20:44 IST

सांडपाण्यामुळे मुळा-मुठेतील सूक्ष्मजीवांची रचना बदलली, पावसाळ्यानंतरही पूर्वस्थिती नाही

पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासात शहरी प्रदूषणाचा परिणाम नदीच्या जैवविविधतेवर कायम राहत असल्याचे दिसून आले.

सांडपाण्यामुळे मुळा-मुठेतील सूक्ष्मजीवांची रचना बदलली, पावसाळ्यानंतरही पूर्वस्थिती नाही छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पुणे शहरातील सांडपाणी आणि प्रदूषणामुळे मुळा-मुठा नदीतील सूक्ष्मजीवांच्या नैसर्गिक रचनेत बदल होत आहे. पावसाळ्यात नदीला मोठा प्रवाह आला, तरीही ही परिस्थिती पूर्ववत होत नाही, असे पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. नदीतील सूक्ष्म शेवाळाचा अभ्यास करताना संशोधकांना हा निष्कर्ष आढळला. नैसर्गिक प्रवाहामुळे प्रदूषके वाहून जात असली, तरी शहरी प्रदूषणाचा प्रभाव नदीतील जैवविविधतेवर कायम राहतो, हे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

उष्णकटिबंधीय नद्यांमध्ये मोसमी पूर आला की प्रदूषके वाहून जातात आणि सूक्ष्मजीवांच्या प्रजातींचे नैसर्गिक मिश्रण पुन्हा प्रस्थापित होते, असे यापूर्वीच्या संशोधनांत दिसले होते. मुळा-मुठा नदीच्या बाबतीत मात्र पावसाळ्यातील मोठ्या प्रवाहाचा परिणाम मर्यादित असल्याचे या अभ्यासात दिसले. पुरामुळे सूक्ष्मजीवांच्या रचनेत काही काळ बदल होतो, पण कोणत्या प्रजाती टिकून राहतील हे प्रदूषणाची पातळी ठरवते.

संशोधक प्रत्याशा नायक आणि डॉ. बालासुब्रमनियन कार्थिक यांनी २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत नदीच्या उगमक्षेत्रापासून शहरी आणि औद्योगिक भागापर्यंत १७ ठिकाणांहून नमुने गोळा केले. त्यांनी पाण्याचे तसेच दगडांवर साचलेल्या जैविक थराचे नमुने घेतले. या नमुन्यांच्या आधारे त्यांनी डायटम्स या एकपेशीय सूक्ष्म शेवाळांचा अभ्यास केला.

डायटम्सच्या पेशीभोवती सिलिकाचे कवच असते. पर्यावरणातील बदलांना हे सूक्ष्मजीव संवेदनशील असतात, म्हणून पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. त्यामुळे नदीतील प्रदूषणाचा परिसंस्थेवर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी डायटम्सचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

स्थानिक प्रजातींची जागा प्रदूषण सहन करणाऱ्या प्रजातींनी घेतली

नदीतील एखाद्या ठिकाणी आढळणाऱ्या डायटम्सच्या प्रजातींची एकूण विविधता वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तुलनेने स्थिर असल्याचे संशोधनात आढळले. मात्र नदी उगमक्षेत्राकडून शहरी भागाकडे जाते, तसतशी प्रजातींच्या रचनेत मोठी तफावत दिसली. स्वच्छ आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असलेल्या उगमाच्या परिसरात पश्चिम घाटातील स्थानिक प्रजाती आढळल्या. शहरी भागात सांडपाणी आणि पोषकद्रव्ये वाढल्याने या संवेदनशील स्थानिक प्रजाती कमी झाल्या. त्यांच्या जागी प्रदूषण सहन करू शकणाऱ्या प्रजातींचे प्रमाण वाढल्याचे संशोधकांना दिसले.

पाण्याच्या रासायनिक गुणधर्मांचाही परिणाम

नदीतील सूक्ष्मजीवांच्या रचनेतील बदलांमागे पाण्याची विद्युत वाहकता आणि विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण हे प्रमुख रासायनिक घटक असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले. पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण वाढले, तर विद्युत वाहकता वाढू शकते. सांडपाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाणही प्रभावित होते. परिणामी पर्यावरणातील बदलांना संवेदनशील असलेल्या स्थानिक प्रजातींच्या अस्तित्वावर परिणाम होऊ शकतो.

निकषांची कठोर अंमलबजावणी महत्त्वाची

नदीचे संवर्धन करण्यासाठी केवळ नैसर्गिक प्रवाह कायम ठेवणे पुरेसे नाही. शहरी सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करणे आणि नदीत सोडल्या जाणाऱ्या प्रदूषकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच पाण्याच्या गुणवत्तेच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणेही महत्त्वाचे आहे, असे या अभ्यासातून पुढे आले आहे.

#पुणे#PT24#Pune

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ