सब-ज्युनियर सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत रायगडला मुला-मुलींच्या दोन्ही गटांत विजेतेपद
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुण्यात झालेल्या योनेक्स सनराईज एसबीए कप स्पर्धेत रायगडने १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात बुलढाण्याला आणि मुलींच्या अंतिम सामन्यात पुण्याला २-१ने हरवले.
सुधांशु बॅडमिंटन अकादमीने समर्थ ग्रुपच्या सहकार्याने आयोजित केलेल्या योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय सब-ज्युनियर आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रायगडच्या संघाने मुलांच्या आणि मुलींच्या, अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले. शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू होती.
१७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात रायगडने बुलढाणा संघाला २-१ असे हरवले. पहिल्या एकेरीत रायगडच्या कृत्य पटेलने बुलढाण्याच्या देवव्रत खांडेकरचा १५-५, १५-६ असा सहज पराभव केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीत बुलढाण्याच्या देवव्रत खांडेकर आणि करण सावळे यांनी रायगडच्या कृत्य पटेल व मयुरेश भुटकी यांना ११-१५, १७-१५, १५-११ असे हरवले आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.
निर्णायक एकेरीच्या सामन्यात रायगडच्या प्रगणय शिंदेने करण सावळेचा १५-९, १५-६ असा पराभव केला आणि रायगडचे विजेतेपद पक्के केले. याआधी उपांत्य फेरीत रायगडने नागपूरवर २-० असा विजय मिळवला होता. त्या सामन्यात कृत्य पटेलने आदित्य यौलला १७-१५, १०-१५, १५-१० असे हरवले, तर दुहेरीत कृत्य पटेल आणि मयुरेश भुटकी या जोडीने आदित्य यौल व साईराज नायसे यांच्यावर १५-९, १५-८ अशी मात केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात बुलढाण्याने ठाण्याला २-० असे हरवले. देवव्रत खांडेकरने विश्वजीत थविलचा १५-१२, १६-१८, १५-१२ असा पराभव केला, तर देवव्रत खांडेकर आणि करण सावळे यांनी मयंक राजपूत व विश्वजीत थविल यांच्यावर १५-८, १५-९ अशी मात केली.
मुलींच्या १७ वर्षांखालील अंतिम फेरीतही रायगडनेच बाजी मारली. त्यांनी पुणे संघाचा २-१ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. रायगडच्या अनुष्का इप्टे आणि प्रांजल शिंदे यांनी निर्णायक कामगिरी केली. पहिल्या एकेरीत अनुष्का इप्टेने पुण्याच्या कायरा रैनाला ८-१५, १७-१५, १५-१० असे हरवून रायगडला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीत पुण्याच्या शरयू रांजणे आणि सोयरा शेलार यांनी अनुष्का इप्टे व प्रांजल शिंदे यांना १५-१३, १५-७ असे हरवले आणि सामना बरोबरीत आणला.
निर्णायक एकेरीत प्रांजल शिंदेने समन्वया धनंजयचा १५-११, १५-१३ असा पराभव केला आणि रायगडचे विजेतेपद निश्चित झाले. उपांत्य फेरीत रायगडने मुंबई उपनगरला २-० असे हरवले होते. त्यात अनुष्का इप्टेने स्पृहा जोशीचा १५-१२, १५-१० असा पराभव केला, तर अनुष्का इप्टे आणि प्रांजल शिंदे या जोडीने अनिका तनेजा व गार्गी दाभोलकर यांच्यावर १५-५, १५-७ अशी मात केली.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक आणि २५ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक आणि १५ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली. बक्षीस वितरण समर्थ ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. या वेळी रायगड बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र भगत, एमबीएच्या कार्यकारी समितीचे सदस्य विश्वास देशवंडीकर, पीडीएमबीएचे स्पर्धा सचिव राजीव बाग आणि स्पर्धा सचिव सुधांशु मेडसीकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.