पुण्यात ७० वर्षांच्या ज्येष्ठाची 2 कोटी 10 लाखांची फसवणूक; ईडीच्या अटकेची धमकी
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जास्त परताव्याचे आमिष आणि मनी लाँड्रिंगमध्ये अटक करण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 2 कोटी 10 लाख रुपयांना फसवल्याची तक्रार आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील एका 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. जास्त परताव्याचे आमिष दाखवण्यात आले आणि त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देण्यात आली, असे या प्रकरणात सांगण्यात येत आहे. सध्या सायबर गुन्हेगारी वाढत असून ऑनलाईन फसवणुकीत वयोवृद्ध नागरिक आणि पेन्शनधारकांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसते.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित व्यक्तीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सेवानिवृत्त असून पुण्यातील मुंढवा भागात एकटेच राहतात.
एफआयआरमधील माहितीनुसार, फिर्यादींना सोशल मीडियावरील एका जाहिरातीतून गुंतवणूक योजनेची माहिती मिळाली. त्या जाहिरातीत प्रसिद्ध उद्योगपती, केंद्रीय मंत्री आणि खेळाडूंचे फोटो वापरले होते. योजनेत मोठा परतावा मिळेल, असेही आमिष दाखवण्यात आले होते.
जाहिरातीतील क्रमांकावर फोन केल्यावर एका व्यक्तीने ही गुंतवणूक कंपनी यू के स्थित असल्याचे सांगितले. त्याने फिर्यादींना 20 हजार रुपये गुंतवायला सांगितले आणि एका आठवड्यात चौपट परतावा मिळेल, असे आश्वासन दिले. फिर्यादींनी यूपीआयद्वारे 20 हजार रुपये पाठवले. आठवडाभरात त्यांच्या गुंतवणुकीच्या खात्यावर 80 हजार रुपये जमा झाले.
यामुळे फिर्यादींचा विश्वास बसला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना आधी पाच लाख रुपये आणि मग टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा गुंतवायला भाग पाडले. एकाच वेळी त्यांनी 1 कोटी 7 लाख रुपये पाठवले. त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये 2 कोटी 80 लाख रुपयांची वाढ झाल्याचे दिसत होते. म्हणून त्यांनी पैसे काढायचे ठरवले, पण त्यांना ते काढता आले नाहीत.
त्यानंतर 2 जुलै रोजी फिर्यादींना एका व्यक्तीचा फोन आला. तो दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. फिर्यादींचा मोबाइल क्रमांक एका गुन्ह्यात आढळल्याचा दावा करून, मुंबई क्राइम ब्रँचकडून फोन येईल, असेही त्याने सांगितले. त्यानंतर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीकडून अटक करण्याची धमकी देण्यात आली.
चौकशीसाठी पैसे द्या, चौकशी पूर्ण झाल्यावर ते परत केले जातील, असे आश्वासन सायबर चोरट्यांनी दिले. या धमकीला घाबरून फिर्यादींनी 8 ते 15 जुलैदरम्यान 1 कोटी 4 लाख रुपये ट्रान्स्फर केले. अखेर सर्व आरोपी संपर्कातून गायब झाले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.