बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पर्यटन विभागाचा सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राइव्हशी करार, ग्रामीण रोजगारावर भर

पर्यटन विभागाचा सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राइव्हशी करार, ग्रामीण रोजगारावर भर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
व्यवसाय PT24 टीम

कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी मुंबईत त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला.

मुंबई: राज्यातील पर्यटनाच्या विकासाला आता कौशल्य विकास, ग्रामीण उद्योजकता आणि स्थानिक समुदायांच्या सहभागाची जोड मिळणार आहे. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाने सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (Sahyadri Farms) आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट (Tata STRIVE) यांच्यासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार केला. नरिमन पॉईंट येथील पर्यटन संचालनालयात हा करार झाला.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, कृषी पर्यटन वाढवणे आणि ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा या कराराचा उद्देश आहे.

कराराच्या कागदावर पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले आणि टाटा स्ट्राइव्हचे मुख्य परिचालन अधिकारी अमेय वंजारी यांनी सह्या केल्या. पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, कृषी व ग्रामीण पर्यटन स्थळांचा विकास, पर्यटनावर आधारित उद्योजकतेला प्रोत्साहन आणि शेतकरी, युवक व महिलांसाठी रोजगारनिर्मिती यावर या करारात विशेष भर आहे.

विकास पानसरे म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासासाठी नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषी पर्यटनाची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा प्रभावी उपयोग करताना स्थानिक समुदायांना पर्यटन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना आवश्यक कौशल्ये व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्यासोबतचा हा सामंजस्य करार त्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे. या सहकार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकऱ्यांना पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाची आदर्श प्रारूपे विकसित करून त्यांचा राज्यभर विस्तार करण्यास मदत होईल. विशेषतः नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनुष्यबळाला पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे."

या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सह्याद्री मोहाडी क्लस्टर आणि पुणे जिल्ह्यातील पवना धरण परिसरात आदर्श कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन क्लस्टर उभारण्याचे नियोजन आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी, युवक, महिला आणि ग्रामीण समुदायांना पर्यटनाशी जोडून त्यांची क्षमता वाढवली जाणार आहे. शेती, अन्नप्रक्रिया आणि कृषी पर्यटनाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभवावर आधारित उपक्रमांनाही प्रोत्साहन मिळेल.

टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींची प्राथमिक निवड, पात्रता तपासणी आणि समुपदेशन केले जाईल. स्थानिक संस्कृती आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या गरजांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल, प्रशिक्षित मार्गदर्शक प्रशिक्षण देतील आणि यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र मिळेल. शिवाय, पूर्वीच्या कौशल्यांची दखल घेऊन त्यांना औपचारिक मान्यता व प्रमाणपत्र देण्यासाठी 'रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग' (आरपीएल) प्रक्रियेलाही चालना दिली जाणार आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावरही भर राहील. त्यामुळे कुंभमेळ्याच्या काळात भाविक व पर्यटकांना दर्जेदार पर्यटन सेवा देण्यासाठी स्थानिक मनुष्यबळाची क्षमता वाढण्यास मदत होईल.

पर्यटन संचालनालय या उपक्रमासाठी धोरणात्मक मार्गदर्शन व संस्थात्मक सहकार्य देईल आणि संबंधित शासकीय विभाग, स्थानिक संस्था व पर्यटन क्षेत्रातील भागधारक यांच्यात समन्वय साधेल. सह्याद्री फार्म्स शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, युवक, महिला आणि ग्रामीण समुदायांना एकत्र आणून अंमलबजावणीसाठी सहकार्य करेल. टाटा स्ट्राइव्ह आपला कौशल्य विकासातील अनुभव, प्रशिक्षण व्यवस्था आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली वापरून प्रशिक्षण व प्रमाणन प्रक्रियेला बळकटी देईल.

पर्यटन विकास केवळ पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता स्थानिक समुदायांचा सहभाग, कौशल्य विकास, ग्रामीण उद्योजकता आणि शाश्वत रोजगारनिर्मिती यांच्याशी जोडण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या त्रिपक्षीय सहकार्यातून तयार होणारी प्रारूपे राज्यातील इतर भागांमध्येही राबवण्याची संधी निर्माण होणार आहे.

#पुणे#कारोबार#PT24#Business#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ