मुखईतील 228 नवमतदारांना पडताळणीसाठी 70 किलोमीटरवरच्या घोडेगावची नोटीस, ग्रामस्थ संतप्त
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिरूर तालुक्यातील मुखई गावातील नवमतदारांना आंबेगाव तालुक्यातील घोडेगावला बोलावल्याने नाराजी आहे. गावातच कॅम्प घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिरूर तालुक्यातील मुखई गावात नुकतीच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या 228 ग्रामस्थांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत. या सर्वांनी सोमवारी, 2 नोव्हेंबर रोजी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे उपस्थित राहावे, असे या नोटिसांमध्ये सांगण्यात आले आहे. मुखईपासून घोडेगाव तब्बल 70 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे गावात नाराजी पसरली आहे.
आंबेगाव तालुका आपल्या कार्यक्षेत्रात येत नाही, शिवाय घोडेगाव गावापासून खूप दूर असल्याने तिथे जाणे गैरसोयीचे आहे, असा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. मुखई हे शिरूर तालुक्यातील गाव आहे. त्यामुळे कागदपत्रे दाखवण्यासाठी शिरूरला जाणे जास्त सोयीचे पडते, असेही त्यांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी हा विषय थेट जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे नेला आहे. त्यांनी ई-मेलद्वारे तक्रार करून मुखई गावातच पडताळणीसाठी कॅम्प घ्यावा, अशी मागणी केली आहे. इतके नवमतदार गावात असताना कॅम्प गावातच व्हायला हवा, असे ग्रामस्थ सांगतात. तसे झाले नाही, तर या नोटिसांना आपला थेट आक्षेप आणि हरकत आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ही तक्रार सरपंच रमेश पलांडे, माजी सरपंच अतुल धुमाळ, संयोगिता पलांडे आणि सचिन पलांडे यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या प्रकरणी प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी सांगितले की, नवमतदारांना किंवा सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, अशीच प्रशासनाची भूमिका असते. मुखईतील मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांची कागदपत्रे शक्यतो सोयीच्या ठिकाणी कशी तपासता येतील, याबद्दल तहसीलदारांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. त्यानुसार तहसीलदार योग्य तो निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.
आंबेगावचे तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले की, मुखईतील 228 नवमतदारांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शक्य झाले तर मुखई गावातच कागदपत्र पडताळणीचा कॅम्प घेता येईल का, याची यंत्रणेमार्फत चाचपणी चालू आहे.
आंबेगावचे नायब तहसीलदार सचिन वाघ म्हणाले की, मुखईच्या ग्रामस्थांच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचल्या आहेत. याबाबत प्रांताधिकारी अर्चना तांबे आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. कोणालाही त्रास देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. मतदार नोंदणी प्रक्रियेचा भाग म्हणून कागदपत्रांची पडताळणी होत आहे आणि या प्रकरणातही योग्य भूमिका घेऊन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही वाघ यांनी सांगितले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.