गुरुवार, 5 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

इंदापुरात हॉटेलजवळ सापळा लावून दोघांना अटक; १२ गुन्हे उघड, १५ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त

इंदापुरात हॉटेलजवळ सापळा लावून दोघांना अटक; १२ गुन्हे उघड, १५ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जबरी चोरी, दरोडा आणि घरफोडीतील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

पुणे जिल्ह्यात जबरी चोरी, दरोडा आणि घरफोडी केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ गुन्हे उघडकीस आणल्याचे पोलिसांनी सांगितले. सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी मिळून एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्यांची नावे मोबाइल उर्फ हरी पवार (वय २२, रा. सुगाव भोसे, पंढरपूर) आणि शक्तीमान हुबर्या काळे (वय २२, रा. माळेगाव, बारामती) अशी आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ग्रामीण भागात घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी आरोपींचा माग काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधीर वाळुंज १ नोव्हेंबरला इंदापूरच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

त्याच वेळी घरफोडी आणि दरोड्यातील आरोपी एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथकाने तिथे सापळा लावला. काही वेळाने दोन दुचाकींवरून तिघे जण हॉटेलजवळ आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्यांचा पाठलाग केला आणि मोबाइल उर्फ हरी पवार याला अल्पवयीन साथीदारासह ताब्यात घेतले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांच्याकडील दुचाकी पंढरपूर आणि करकंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. दौंड तालुक्यातील खडकी गावात झालेल्या घरफोडीतील मोबाइलही पोलिसांनी जप्त केला. पुढील तपासात वडगाव निंबाळकर परिसरात झालेली जबरी चोरीही आरोपींनी केल्याचे समोर आले. त्या प्रकरणात शक्तीमान काळे याला अटक करण्यात आली.

आरोपींनी पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी एक दरोडा, एक जबरी चोरी आणि ८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. सोलापूर जिल्ह्यात दोन ठिकाणांहून दुचाकी चोरल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून १० तोळे वजनाचे दागिने, दोन दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, अपर अधीक्षक शुभम कुमार, डीवायएसपी चैतन्य कदम, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, एपीआय जीवन मोहिते, उपनिरीक्षक मुलाणी आणि उपनिरीक्षक सुधीर वाळूंज यांनी केली.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल म्हणाले, "पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत घरफोडीसह जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. त्यांनी केलेले १२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाने चांगली कारवाई करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत."

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ