बारामती, इंदापूरला मुसळधार पावसाचा तडाखा; द्राक्ष, डाळिंब बागांवर संकटाची भीती
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बारामती शहरात सकाळी सातपर्यंत १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला, पण फळबागांच्या नुकसानीची चिंता कायम आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती शहर, जिरायती पट्टा आणि इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. बारामती शहरात सकाळी सातपर्यंत १५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही सकाळी सव्वादहापर्यंत पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे एकूण नोंद १७० मिलिमीटरच्या पुढे गेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते आणि सखल भाग जलमय झाले. अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला. दुसरीकडे, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
बारामती शहरात पहाटे साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच पावसाचा जोर प्रचंड असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. सखल भागांतून पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणी रोजच्या जनजीवनावर परिणाम झाला. गेल्या अनेक दिवसांनंतर बारामतीकरांनी ढगफुटीसारखा पाऊस अनुभवला.
शहराबरोबरच माळेगाव, काटेवाडी, पिंपळी-लिमटेक आणि सोनगाव या भागांतही दमदार पाऊस झाला. जिरायती पट्ट्यातील मोरगाव, जळगाव क.प. तसेच इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर, लासुर्णे आणि आसपासच्या गावांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बारामती परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद झाले होते. जिरायती भागातली परिस्थिती गंभीर झाली होती, तर बागायती पट्ट्यातही पाण्याची अडचण जाणवू लागली होती. अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खाली गेली होती. परतीच्या पावसाच्या अपेक्षेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले होते, पण हस्त नक्षत्राच्या काळातही अपेक्षित पाऊस न झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली होती.
त्यातच काही दिवसांपूर्वी नीरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने टंचाई आणखी गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी पहाटेपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरही आशा निर्माण झाल्या आहेत.
बारामती आणि इंदापूर तालुक्यातील ऊस उत्पादकांना तसेच चारा पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी अडचणीत आलेल्या पिकांना या पावसाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
मात्र, मुसळधार पावसाचा द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांना फटका बसण्याची शक्यता असल्याने फळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पिकांचे किती नुकसान होणार, हे पावसाचा जोर आणि त्यानंतरचे हवामान कसे राहते, यावर अवलंबून असेल. एकीकडे पाणीटंचाईत सापडलेल्या शेतीला नवी उमेद मिळाली आहे, तर दुसरीकडे फळबागांच्या नुकसानीची भीती कायम आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.