वर्धा फसवणूक प्रकरणातील पाहिजे आरोपी नोएडातून ताब्यात, सात दिवस चालला शोध
शेतकरी आणि व्यापाऱ्यांना बियाणे व डिस्ट्रिब्युटरशिपचे आमिष दाखवून फसवल्याच्या प्रकरणात पाहिजे असलेल्या जसवंत सिंग याला वर्धा शहर पोलिसांनी नोएडा येथून ताब्यात घेतले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्धा शहर पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी जसवंत सिंग (वय 39) याला उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर नं 168 मधून ताब्यात घेतले आहे. तो इटावा जिल्ह्यातील जसवंत नगर तालुक्यातील तमेरी येथील रहिवासी आहे. सातत्याने आणि शिताफीने शोध घेतल्यानंतर पोलिसांना हे यश मिळाले.
वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये 28.12.2023 रोजी अपराध क्रमांक 1674/2023 नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा भादंवि कलम 420 आणि 34 अन्वये दाखल आहे. या गुन्ह्यात जसवंत सिंग पाहिजे आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना शेतीमाल तसेच बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी विविध परवाने आणि डिस्ट्रिब्युटरशिप मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले, असा आरोप आहे. या व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात तो पाहिजे आहे.
त्याला पकडण्यासाठी आतापर्यंत पोलिसांची चार पथके तयार करून शोध घेण्यात आला होता. मात्र तो सापडला नव्हता. त्यामुळे पोलीस निरीक्षक नागेशकुमार चतरकर यांनी वर्धा शहर पोलिसांचे एक विशेष पथक तयार केले.
या पथकाने आरोपी लपण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांचा बारकाईने शोध घेतला. सलग सात दिवस उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील विविध ठिकाणी तपास आणि शोधमोहीम राबवण्यात आली. दिल्ली, नोएडा, तसेच आरोपीचे मूळ गाव तमेरी आणि जसवंतनगर, रजमउ, बैदपूरा अशा ठिकाणी जाऊन माहिती गोळा करण्यात आली.
पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून आरोपी आपले ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तरीही उपलब्ध तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने त्याच्या हालचालींचा माग काढला. त्याचा ठावठिकाणा निश्चित करून सेक्टर 168, नोएडा येथून त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि आवश्यक ट्रान्झिट वॉरंट मिळवण्यात आले. त्याला वर्धा शहर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही आणि तपास सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध वर्धा शहर पोलीस स्टेशन, हिंगणघाट पोलीस स्टेशन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे काही प्रकरणांमध्ये नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील इतर कोणत्या पोलीस ठाण्यांत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत किंवा न्यायालयीन नॉन बेलेबल वॉरंट प्रलंबित आहेत का, याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यांकडून घेऊन पडताळणी केली जात आहे. तो अन्य कुठल्या गुन्ह्यात पाहिजे असल्यास त्या पोलीस ठाण्यांना आवश्यक माहिती देऊन पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वर्धा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश कुमार चतरकर यांनी नेतृत्व केले.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, घनशाम जाधव, पो.हवा/523 महेंद्र पाटील, पो.हवा/1416 अभिजित वाघमारे, पो.अं/1717 रंजीत भुरसे आणि पो.अं/970 अमोल साळवन यांनी या कारवाईत भाग घेतला. सायबर सेलचे पोहवा/1403 अक्षय राउत यांचाही यात सहभाग होता.