मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

वैजापुरात येवला रस्त्यावर दोन गटांत हाणामारी, ९ जखमी; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

वैजापुरात येवला रस्त्यावर दोन गटांत हाणामारी, ९ जखमी; २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

गणेश विसर्जन मिरवणुकीतील जुन्या वादाचा राग धरून दोन गट शनिवारी वैजापुरात एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंच्या फिर्यादींवरून वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे.

वैजापूर शहरातील येवला रस्त्यावर शनिवारी दोन गट हत्यारांसह एकमेकांवर तुटून पडले. हॉटेल शान ए मराठा आणि जीवनश्री कॉलनी परिसरात घडलेल्या या हाणामारीत ९ जण जखमी झाले. गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

या मारामारीत कोयता, लोखंडी कत्ती, लोखंडी रॉड, फावड्याचा फायबर दांडा आणि लाकडी दांडके वापरले गेले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या असून त्यावरून २० ते २५ जणांविरुद्ध वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला रस्ता येथे राहणाऱ्या कृष्णा चंद्रकांत जाधव (वय २१) यांनी एक फिर्याद दिली आहे. विसर्जनाच्या वेळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शान पवार, रोहित पठारे, प्रितेश साळुंके, विशाल पवार, तुषार पठारे आणि आदेश शेवाळे यांनी हॉटेलमधील इतर कामगारांसह लोखंडी कत्ती, कोयता आणि फावड्याच्या फायबर दांड्याने हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डोक्यावर आणि हातावर वार झाल्याचे, तसेच इतरांनाही मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या हल्ल्यात कृष्णा जाधव, निर्भय पवार, विशाल रामदास कडे आणि सुजित राजपूत जखमी झाले.

दुसरी फिर्याद हॉटेल व्यावसायिक भूषण पवार (वय ४०, रा. बजरंग चौक, वैजापूर) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास हॉटेल शान-ए-मराठा परिसरात जुन्या वादातून जमावाने हल्ला केला. विशाल पवार यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी मारून गंभीर जखमी करण्यात आले, असा आरोप आहे. हॉटेलमधील कामगारांनाही मारहाण झाली आणि काहींची डोकी फोडण्यात आल्याचा आरोप आहे. गणपती मंडळातील रोहित पठारे आणि तुषार पठारे यांनाही गंभीर मारहाण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या फिर्यादीवरून नितीन होंड, गौरव हॉड, गजू राजपूत, क्रिश राजपूत, संकेत आहेर, प्रतीक लुटे, सुजित ठाकूर उर्फ राजपूत, विशाल कडे, रोहित आहेर, हर्षद राजपूत, अमर राजपूत, तुषार आहेर, मयूर रहाणे आणि इतरांवर गुन्हा नोंदवला आहे.

जखमींमध्ये विशाल पवार, शान पवार, संतोष शिहरे, आदेश शेवाळे आणि भूषण पवार यांचाही समावेश आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर जखमींना तिथून छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात, तसेच येवला, कोपरगाव आणि वैजापुरातील खासगी रुग्णालयांत हलवण्यात आले. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

एका जखमीला शहराबाहेर नेऊन मारहाण करण्यात आली आणि नंतर स्टेशन रोडच्या बाजूला फेकून देण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे. त्या व्यक्तीला शोधण्यासाठी पोलिसांना काही तास धावपळ करावी लागली.

विसर्जन मिरवणुकीतील वादानंतर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला असतानाही त्याच वादातून दोन गट पुन्हा समोरासमोर आले आणि हत्यारांसह हल्ले झाले, ही बाब गंभीर असल्याचे बोलले जात आहे. भरदिवसा कोयते, कत्त्या आणि लोखंडी रॉड घेऊन जमाव एकमेकांवर तुटून पडत असेल, तर कायद्याचा धाक नेमका कुठे आहे, असा सवालही उपस्थित होत आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ