सोशल मीडियावर सीईटी कक्षाबाबत चुकीची माहिती पसरवल्यास कायदेशीर कारवाई, एका यूट्यूबरला नोटीस
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे, तर एका यूट्यूब चॅनेलला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने, म्हणजेच सीईटी कक्षाने, सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. हा कक्ष विविध व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया राबवतो. अशा चुकीच्या माहितीवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.
अलीकडच्या काळात सीईटी कक्षाच्या प्रवेश परीक्षा, वेळापत्रक, परीक्षेचे निकाल आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया याबाबत अनेकदा दिशाभूल करणारी, अपूर्ण आणि असत्य माहिती किंवा दावे प्रसिद्ध केले जात असल्याचे कक्षाच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि सीईटी कक्षाच्या प्रतिमेलाही बाधा पोहोचते.
त्यामुळे कक्ष यावर देखरेख ठेवणार असून एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि व्हॉट्सॲप या सोशल मीडियावरील अकाऊंट चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी आणि चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कक्षाने एक टास्क फोर्स स्थापन केला आहे.
विद्यार्थी आणि पालकांनाही कक्षाने आवाहन केले आहे. सीईटीशी संबंधित चुकीची माहिती, पोस्ट, रील, पॉडकास्ट, व्हिडीओ किंवा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर आढळला, तर त्याची तक्रार करावी. परीक्षा केंद्रे बदलून देण्याचा दावा करणे, पर्सेंटाइल गुण वाढवून देण्याचा दावा करणे, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील तक्रारीही पाठवता येतील. या सर्व तक्रारी socialmedia.complaints@mahacet.org याच ईमेलवर पाठवायच्या आहेत. तक्रारीची सत्यता पडताळून सीईटी कक्ष त्यावर कायदेशीर कारवाई करेल.
दरम्यान, एका यूट्यूबरला कक्षाने नोटीस बजावली आहे. डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर शिवा नावाच्या यूट्यूबरने पॉडकास्ट करून एमएचटी सीईटी २०२७ च्या दोन्ही परीक्षांच्या तारखा, अर्ज नोंदणीच्या तारखा आणि निकालाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि याबाबतच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे आल्या होत्या.
सीईटी कक्षाने २०२७ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा अजून जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे डिजिटल मास्टर चॅनेलला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असून तो व्हिडीओ यूट्यूबवरून तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच डिजिटल मास्टर चॅनेलवरच याबाबतचे स्पष्टीकरण प्रसारित करावे आणि याबाबतचे लेखी स्पष्टीकरण पुराव्यासह सीईटी कक्षाकडे सादर करावे, असे निर्देशही या कायदेशीर नोटिशीत देण्यात आले आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.