श्रुती हासनने मासिक पाळीच्या त्रासाबाबत मोकळेपणाने केली चर्चा, पुरुषांनाही पाळी यावी म्हणून प्रार्थना
अभिनेत्री श्रुती हासनने सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये मासिक पाळी, पीसीओएसमुळे होणारा त्रास आणि 'पीरियड हॉलिडे'बद्दल स्पष्टपणे मत मांडलं.
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री श्रुती हासन हिने आता मासिक पाळीच्या विषयावर परखडपणे भाष्य केलं आहे. वैयक्तिक आयुष्य असो किंवा महिलांशी निगडित विषय, आपलं मत मोकळेपणाने मांडणाऱ्या श्रुतीने यावेळी पीसीओएसमुळे (PCOS) स्वतःला होणाऱ्या वेदनादायक मासिक पाळीच्या त्रासाबद्दल सांगितलं.
सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावताना श्रुतीने मासिक पाळी, सेटवर काम करताना येणाऱ्या अडचणी आणि 'पीरियड हॉलिडे' या विषयावर मनमोकळी चर्चा केली.
गंमतीच्या सुरात बोलताना श्रुती म्हणाली की, महिलांना मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास पुरुषांना कधीच समजत नाही. त्यामुळे पुरुषांनाही मासिक पाळी यावी, अशी प्रार्थना आपण देवाकडे हजारो वेळा केली असल्याचं तिने सांगितलं. पुरुषांनाही हा अनुभव आला असता तर कामाच्या ठिकाणी 'पीरियड हॉलिडे'चं महत्त्व त्यांना पटलं असतं, असं तिचं म्हणणं आहे. करारांमध्येही मासिक पाळीच्या रजेची तरतूद असायला हवी, असं मत तिने व्यक्त केलं.
करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात सेटवर मासिक पाळीबद्दल बोलायची भीती वाटायची, असं श्रुतीने सांगितलं. या विषयावर कोणाशीही बोलू नये असं तिला त्यावेळी वाटायचं. पण नंतर तिच्या लक्षात आलं की, आपला त्रास आधीच टीमला सांगितला तर शूटिंगदरम्यान टीम त्यानुसार नियोजन करू शकते.
याबाबत तिने एका सहकलाकाराचा अनुभवही सांगितला. त्या सहकलाकाराने गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल टीमला आधीच कल्पना दिली होती, त्यानंतर पूर्ण टीमने त्याची परिस्थिती लक्षात घेऊन शूटिंगचं वेळापत्रक ठरवलं होतं. हे पाहिल्यावर श्रुतीलाही स्वतःच्या मासिक पाळीच्या त्रासाबाबत उघडपणे बोलायचा आत्मविश्वास मिळाला. तिने दिग्दर्शकाला याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यानेही आपल्या मुलीला मासिक पाळीदरम्यान प्रचंड वेदना होत असल्याचं सांगितलं. त्यानंतर या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्याचं श्रुतीने नमूद केलं.
आपली अडचण टीमला माहीत असेल तर टीम अधिक चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकते, असं श्रुतीचं म्हणणं आहे. त्यामुळे आता मासिक पाळी आल्यावर ती ही गोष्ट लपवत नाही. "मी काम करेन, पण मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही अधिक पाठिंबा देऊ शकता," असं तिने सांगितलं.
यापूर्वीही श्रुती हासनने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे बोलली होती. लग्नाच्या कल्पनेने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं होतं. स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली असल्याने, लग्नानंतर त्यावर परिणाम होईल का, अशी भीती तिला वाटत होती. मात्र प्रेम आणि नात्यांमधील वचनबद्धतेवर तिचा विश्वास असून भविष्यात आई होण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. मासिक पाळी आणि 'पीरियड हॉलिडे'बद्दलच्या ताज्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.