प्रेम असूनही नात्यात दुरावा? या 7 रोजच्या सवयी ओळखा आणि वेळीच बदला
मोठी भांडणं नसतानाही नात्यात जवळीक कमी होत असेल, तर रोजच्या छोट्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नात्यात मोठी भांडणं होत नसली तरी दोघांमधला जिव्हाळा आधीसारखा राहत नाही, असं अनेकदा घडतं. संवाद कमी होतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते आणि एकत्र असतानाही एक विचित्र अंतर जाणवायला लागतं. याचं कारण बऱ्याचदा एखादी मोठी चूक नसते, तर रोजच्या आयुष्यातल्या छोट्या सवयी असतात. समोरच्याला मध्येच थांबवणे, प्रत्येक संभाषणात फोनमध्ये गुंतून राहणे किंवा त्याच्या प्रयत्नांना गृहीत धरणे अशा गोष्टी वरवर पाहता किरकोळ वाटतात, पण त्या वारंवार घडत राहिल्या की जोडीदाराला दुर्लक्षित किंवा कमी महत्त्वाचं वाटायला लागतं. या सवयी वेळीच ओळखणं हे नातं टिकवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल ठरू शकतं.
पहिली सवय म्हणजे बोलताना फोनवर लक्ष असणं. जोडीदार एखाद्या महत्त्वाच्या विषयावर बोलत असताना तुमचं लक्ष सतत फोनकडे असेल, तर काही मिनिटांसाठी मेसेज बघितला तरी समोरच्याला वाटू शकतं की त्याचं बोलणं तुमच्यासाठी तितकं महत्त्वाचं नाही. दुसरी सवय म्हणजे लहानसहान गोष्टी सतत 'नंतर बघू' म्हणून पुढे ढकलणे. जोडीदाराची एखादी विनंती किंवा लाडिक हट्ट वारंवार टाळला गेला, तर त्याच्या भावना कमी लेखल्या जात असल्यासारखं त्याला वाटू शकतं.
तिसरी सवय म्हणजे प्रत्येक गोष्टीत चुका काढणे. घरातल्या कामांपासून कपडे, मित्रमंडळी किंवा निर्णयांपर्यंत सतत टीका केली, तर नात्यावर परिणाम होतो. सल्ला देणं वेगळं आणि सतत चुका काढणं वेगळं. चौथी सवय म्हणजे जोडीदाराच्या प्रयत्नांबद्दल आभार किंवा कौतुक न मानणं. दीर्घकाळच्या नात्यात आपण अनेकदा जोडीदार करत असलेल्या गोष्टी गृहीत धरतो, पण एक छोटासा आभार किंवा कौतुकाचा शब्दही नात्यातला आदर टिकवून ठेवतो.
पाचवी सवय म्हणजे रागाच्या भरात जुने मुद्दे उकरून काढणे. भांडण चालू असताना अचानक महिन्या-वर्षांपूर्वीच्या चुका आठवणं वादाला लांबवतं. जुना मुद्दा खरोखर सध्याच्या विषयाशी संबंधित असेल तर त्यावर वेगळ्या वेळी शांतपणे बोलता येतं. सहावी सवय म्हणजे जोडीदाराचं बोलणं पूर्ण होण्याआधीच उत्तर देणं. समोरचा काय बोलणार हे आधीच माहीत आहे असं वाटून त्याला मध्येच थांबवलं, तर संभाषण भांडणासारखं वाटतं. आधी ऐकून मग बोलणं ही छोटी पण परिणामकारक सवय आहे. सातवी सवय म्हणजे एकत्र वेळ घालवणं ही केवळ औपचारिकता बनणे. एकाच घरात राहणं आणि प्रत्यक्षात वेळ घालवणं यात फरक असतो. दोघेही आपापल्या फोनमध्ये गुंतलेले असतील किंवा बोलणं फक्त घरगुती जबाबदाऱ्यांपुरतं मर्यादित असेल, तर भावनिक जवळीक कमी होते.
नातं सुधारण्यासाठी मोठ्या उपायाची गरज नसते, रोजच्या संवादातूनच बदल सुरू होतो. जोडीदाराचं लक्षपूर्वक ऐकणं, त्याच्या प्रयत्नांची दखल घेणं आणि मतभेद असतानाही आदराने बोलणं या छोट्या गोष्टींचा परिणाम दीर्घकाळ टिकतो.