पुण्यात शस्त्र वापरणाऱ्या सराईतांवर पोलिसांची कारवाई, पाच जण ताब्यात; चार पिस्तुले जप्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवली, चोवीस तासांत तीन पोलीस स्टेशनांच्या हद्दीत चार पिस्तुले जप्त.
पुण्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शहर पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांविरुद्ध खास मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अवघ्या चोवीस तासांत शहरातील तीन पोलीस स्टेशनांच्या हद्दीतून चार पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या कारवाईत तीन प्रौढांसह दोन विधीसंघर्षित बालकांनाही ताब्यात घेण्यात आले.
पुणे शहरात सध्या शस्त्रबंदीचे आदेश लागू आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर आहे. वर्षभरात साधारण साडे सहा हजार जणांवर आतापर्यंत कारवाई झाली असून, विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गस्त घालणे, संशयितांची तपासणी करणे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करणे, अशा पद्धतीने ही मोहीम राबवली जात आहे.
चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगावशेरी गावठाण भागात स्मशानभूमीजवळ गस्त घालत असताना पोलिसांना दोन जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यांची झडती घेतल्यावर उज्ज्वल विनोद लव्हे (वय २३, राहणार देवाची उरुळी) आणि आकाश उर्फ गज्या अशोक मोरे (वय २०, राहणार वडगावशेरी) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
दुसरीकडे, भारती विद्यापीठ पोलिसांनी लेकटाऊन रोडवरील राजाराम कदम जलतरण तलाव परिसरात कारवाई करत दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. दोन्ही बालकांच्या पालकांना समजपत्र देण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या तसेच गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असलेल्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
याशिवाय कोंढवा पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईताला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. अटक झालेल्याचे नाव अमन जमील खान (वय २७, राहणार सुप्रीम लिगा सोसायटी, इनामनगर, कोंढवा खुर्द) असे आहे. वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. खान हा सराईत गुन्हेगार असून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. कोंढवा परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत असताना तपास पथकातील पोलीस कर्मचारी पुष्पेंद्र चव्हाण आणि केशव हिरवे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती.