गहुंजेतील आलिशान फ्लॅटमध्ये लंडनमध्ये शिकणाऱ्या मुग्धा देशमुखचा कुजलेला मृतदेह सापडला; एसी सुरू असल्याने
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
छत्रपती संभाजीनगरची मूळ रहिवासी असलेल्या ३४ वर्षांच्या मुग्धा देशमुखचा मृतदेह पुण्यातील गहुंजे येथील फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळाला. पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
पुण्यातील गहुंजे येथील एका उच्चभ्रू इमारतीतल्या आलिशान फ्लॅटमध्ये ३४ वर्षांच्या मुग्धा देशमुख हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. मुग्धा मूळची छत्रपती संभाजीनगरची असून ती लंडनमध्ये राहून एमबीएचे शिक्षण घेत होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
मुग्धा जुलै २०२५ मध्ये शिक्षणासाठी लंडनला गेली होती. मात्र, पाच दिवसांपासून बंद असलेल्या गहुंजेतील या फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह अतिशय भयानक स्थितीत आढळला. त्यामुळे या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या तरुणीचा मृतदेह पुण्यातील फ्लॅटमध्ये सापडल्याने सगळीकडे चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबरला मुग्धाचे तिच्या आईशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी आपण मुलाखतीसाठी जात आहोत आणि घाईत आहोत, असे तिने सांगितले होते. त्यानंतर तिचा कुटुंबाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला.
काळजी वाटू लागल्याने घरच्यांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. तेव्हा मुग्धा ऑगस्टच्या शेवटीच भारतात परतली असल्याचे त्यांना समजले आणि सर्वांनाच धक्का बसला.
कुटुंबीयांनी तिच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले, तर त्यात झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy) आणि ब्लिंकीट (Blinkit) वरून काही ऑर्डर केल्याचे दिसले. यावरून ती भारतातच असल्याचे स्पष्ट झाले. मग कुटुंबीय तातडीने पोलिसांकडे गेले आणि त्यांनी अपहरणाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गहुंजे येथील उच्चभ्रू इमारतीतला हा फ्लॅट शोधून काढला.
पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा बेडवर मुग्धाचा कुजलेला मृतदेह दिसला. प्राथमिक अंदाजानुसार, तिचा मृत्यू ४ ते ५ दिवसांपूर्वी झाला असावा. इतके दिवस मृतदेह कुजत असतानाही शेजाऱ्यांना कसलाच संशय आला नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस खोलीत शिरले तेव्हा फ्लॅटमधील फॅन आणि एसी सतत सुरू होते. गेले ४-५ दिवस एसी चालू राहिल्यामुळेच मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरली नाही, असे सांगितले जात आहे.
मुग्धाने स्वतः जीवन संपवण्यापूर्वी हे सगळे ठरवून केले होते, की तिच्यासोबत काही घातपात घडवून एसी सुरू ठेवण्यात आला, असा दाट संशय व्यक्त होत आहे. हा केवळ संशय आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.