शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
15 ऑक्ट | 15:10  विदर्भात दुष्काळाची पकड घट्ट, आणखी १३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश 11:40  भांडेवाडी हत्याकांडातील तीन महिन्यांपासून फरार कथित सूत्रधार अमन कैतवार उत्तर प्रदेशातून अटकेत 11:11  राज्यात २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी; प्राथमिक शाळा १८, माध्यमिक १९ नोव्हेंबरला उघडणार 10:40  गेवराईत चौथीच्या विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात 09:41  नागपूर पदवीधर निवडणूक: २३ ऑक्टोबरला मतदान, जिल्हा प्रशासनाची तयारी वेगात; अधिकाऱ्यांना सूचना 08:54  सोने-चांदीचे १६ ऑक्टोबरचे दर जाहीर: २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम १४,७४३ रुपये, चांदी प्रति ग्रॅम २२९.९० रुपये
सर्व थेट अपडेट
13:57 IST

फलटणच्या श्रीराम कारखान्याचा ७० वा गळीत हंगाम सुरू; रामराजेंचा माजी खासदारांवर आरोप

फलटण श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी झाला. यावेळी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप केला.

फलटणच्या श्रीराम कारखान्याचा ७० वा गळीत हंगाम सुरू; रामराजेंचा माजी खासदारांवर आरोप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

फलटण श्रीराम सहकारी साखर कारखान्याने ७० व्या गळीत हंगामात पदार्पण केले आहे. कारखाना बंद पडणार, त्याचे खासगीकरण होणार, अशी चर्चा सुरू होती. या चर्चांना मागे सारत सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी हंगामाचा शुभारंभ झाला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि वाहतूकदारांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.

सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून आणि बॉयलर अग्निप्रदीपन करून करण्यात आला. यावेळी बोलताना रामराजे यांनी कारखान्याच्या अडचणींमागे राजकीय डावपेच असल्याचा आरोप केला आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. "आपला ऊस आपल्याच श्रीराम कारखान्याला द्या," असे आवाहन करत त्यांनी सभासदांनी एकजूट कायम ठेवावी, असेही सांगितले.

कारखान्याची निवडणूक दीड ते पावणेदोन वर्षे लांबली, त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला, असे रामराजे यांनी सांगितले. सहकार विभाग आणि साखर आयुक्तांचा अहवाल मागवून निर्णय घेतला असता, तर तक्रारी टाळता आल्या असत्या, असे मत त्यांनी मांडले. या घडामोडींमागे माजी खासदारांचे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आदर आहे, असे सांगतानाच रामराजे म्हणाले की, त्यांच्या नावाचा आधार घेऊन सहकारी संस्थांच्या कारभारात हस्तक्षेप करणे योग्य नाही. विकासकामे रोखणे, सहकारी कारखान्यांना अडचणीत आणणे आणि बँकांवर नियंत्रण मिळविण्याचे राजकारण केल्याने पक्षाचा विस्तार होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

अडचणीच्या काळात कामगारांनी केलेला त्याग आणि सभासदांनी दाखविलेली एकजूट यामुळे कारखाना पुन्हा सुरू होण्यास मदत झाली, असे रामराजे यांनी नमूद केले. कारखान्याचे भागभांडवल पूर्ण करून आर्थिक पाया मजबूत करण्यासाठी सभासदांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

माजी खासदारांनी त्यांच्या कारखान्याच्या संचालकांची नावे, उसाचे गाळप, साखर उतारा आणि देणी यांची माहिती जाहीर करावी, असे आव्हानही रामराजे यांनी दिले. संबंधित कारखान्यात काटामारी होत असल्याचा आरोप करत साखरवाडी आणि श्रीराम हे दोन्ही कारखाने आपण वाचविल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या संसारावर राजकीय स्वार्थामुळे परिणाम होत असेल, तर वयाच्या ७८ व्या वर्षीही रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशाराही त्यांनी दिला.

कारखाना सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार आणि परिसरातील व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र नियमित गाळप, कारखान्याचे आर्थिक स्थैर्य आणि ऊस उत्पादकांना योग्य मोबदला मिळवून देणे ही व्यवस्थापनापुढील महत्त्वाची आव्हाने असतील. दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आगामी हंगामातील उसाचे उत्पादन पाणीवाटपाच्या नियोजनावर अवलंबून राहणार असल्याचेही रामराजे यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले, धनंजय पवार, अमोल सस्ते, भगवान होळकर, जितेंद्र पवार, दत्ता बापू अनपट, रेश्मा भोसले यांच्यासह संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक सभासद व वाहतूकदार उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक संतोष खटके यांनी केले, तर सुखदेव बेलदार यांनी आभार मानले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ