Nitin Gadkari : बायको जर ठीक नसेल, तर...; भव्य कार्यक्रमाच्या मंचावरून मोलकरीण म्हणत नितीन गडकरी खूप काही
नागपुरात एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बायकोबद्दल आणि तिच्या कर्तृत्वाबद्दल स्पष्ट शब्दांत भाष्य केलं.
बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात पुन्हा एकदा असं वक्तव्य केलं आहे, ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय असो वा सांस्कृतिक व्यासपीठ, गडकरींची वक्तव्यं नेहमीच चर्चेत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी रेड लाइट एरियातून सर्वाधिक मतं मिळाल्याचा दावा केला होता. आता त्यांनी थेट बायकोबद्दल भाष्य केलं आहे. माणूस कितीही कर्तृत्ववान असला तरी बायको ठीक नसेल, तर तो राजकारणात, समाजकारणात आणि व्यवसायात यशस्वी होऊ शकत नाही, असं गडकरी म्हणाले.
नागपुरातल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात गडकरी हे वक्तव्य करत होते. माजी आमदार अनिल सोले यांचा ६७ वा वाढदिवस साजरा होत असताना गडकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी सोले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर 'अविरत कार्यरत : प्रा. अनिल सोले' या गौरवग्रंथाचं प्रकाशनही झालं. या कार्यक्रमात गडकरींनी उपस्थितांशी संवाद साधताना जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
बोलताना गडकरी म्हणाले की, त्यांचं लग्न झालं तेव्हा त्यांच्याकडे शंभर-दीडशे कप चहा व्हायचा. एवढ्या मोठ्या संख्येने पाहुणे-मंडळी घरी येत असल्यामुळे घरातलं काम प्रचंड वाढलं होतं. यावर त्यांच्या बायकोने त्यांना विचारलं होतं की, मला बायको म्हणून आणलं की मोलकरीण म्हणून? सामाजिक-राजकीय आयुष्य जगताना घरच्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, असंही ते म्हणाले. आपली मुलं चांगली निघाली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले, याकडे आपण फारसं लक्ष दिलं नाही, पण बायकोने लक्ष दिलं नसतं तर सगळ्याच्याच चिंधड्या झाल्या असत्या, असं गडकरी म्हणाले. एखाद्या माणसाच्या यशामागे स्त्रीचं कर्तृत्व असतं, असं सांगत गडकरींनी स्त्रीच्या कर्तृत्वावर भर दिला आणि आपल्या पत्नीच्या योगदानाचं जाहीरपणे कौतुक केलं.
काही दिवसांपूर्वी गडकरींनी रेड लाइट एरियाबद्दलही एक मोठं वक्तव्य केलं होतं. मागच्या निवडणुकीत सुशिक्षित भागांपेक्षा क्रिमिनल, अंडरवर्ल्ड आणि रेड लाइट एरियातून जास्त मतदान झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. सुशिक्षित लोकांनी ७० ते ७५ टक्के मतदान केलं असेल, पण गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डशी संबंधित भागातून ९२ टक्के मतं मिळाली, असं ते म्हणाले होते. यावरून संबंधित लोकांशी आपले संबंध आहेत, असा अर्थ काढू नये, असंही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. त्या भागांमध्ये रस्ते आणि सामाजिक कामं केल्यामुळे तिथल्या लोकांनी आपल्याला मतदान केलं, असं गडकरींनी सांगितलं होतं. या दोन्ही वक्तव्यांमुळे गडकरींची बिनधास्त बोलण्याची शैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.