पाच महिन्यांचा पगार नाही म्हणून सासवडमध्ये कर्मचाऱ्याने पाणी बंद केले; व्हिडिओनंतर ७७ हजार मिळाले
सासवड नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कामगाराने आत्महत्येचा इशारा देणारा व्हिडिओ टाकला आणि काही वेळातच ठेकेदाराने पगार दिला.
सासवड नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील एका कंत्राटी कामगाराने पाच महिन्यांचा पगार न मिळाल्याने पाणी बंद केले आणि आत्महत्येचा इशारा दिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली. त्यानंतर काही वेळातच ठेकेदाराने त्याला पगार दिला.
प्रकाश यादव हे सासवड नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कामगार आहेत. सुमारे पाच महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. त्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, तरी पगार मिळाला नाही. त्यामुळे ते वैतागले होते.
अखेर ते विद्युत पंप ठेवलेल्या खोलीत गेले. "मला पाच महिन्यांचा पगार मिळाला नाही, त्यामुळे मी आजपासून पाणी बंद करत आहे," असे म्हणून त्यांनी सर्व पंप बंद केले. "मला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर याच ठिकाणी छताला गळफास घेऊन आत्महत्या करणार," असाही इशारा त्यांनी दिला. हे सगळे त्यांनी स्वतःच्या व्हिडिओत रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले.
व्हिडिओ पसरताच शहरात आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली. नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने त्याची गंभीरपणे दखल घेतली आणि ठेकेदाराला चांगलेच सुनावले असावे, असा अंदाज आहे.
त्यानंतर ठेकेदाराने तातडीने कर्मचाऱ्याची भेट घेतली आणि त्यांची समजूत काढली. पाच महिन्यांचा सुमारे ७७ हजार रुपये पगार त्यांच्या हातात दिला. मग कर्मचाऱ्याने नवा व्हिडिओ बनवला. ठेकेदाराने पाच महिन्यांचे पैसे दिले असून आता माझी काहीही तक्रार नाही, असे त्यांनी त्यात सांगितले. हा व्हिडिओही त्यांनी समाज माध्यमावर टाकला.
स्वतः केलेल्या कामाचा पगार मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याला शहराचा पाणी पुरवठा काही वेळ बंद करावा लागला. एवढेच नाही, तर आत्महत्येचा इशारा द्यावा लागला. त्यानंतरच प्रशासन जागे झाले. प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाचा अनुभव त्यामुळे संपूर्ण तालुक्याला आला आहे.
काही दिवसांपूर्वीच सासवडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनच्या ऑलमध्ये एक मेलेले कुत्रे अतिशय कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. त्याभोवती हजारो आळ्या आणि किडे जमलेले दिसले. आमदार विजय शिवतारे यांनी स्वतः त्याची दखल घेतल्यानंतर काही वेळातच प्रशासन भानावर आले. त्यांनी तेथे स्वच्छता करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
यातून एक गोष्ट पुढे आली, ती म्हणजे प्रशासनाला जागेवर आणायचे असेल तर काही तरी वेगळ्या मार्गाने जावे लागते. पण हे किती दिवस चालणार, असा प्रश्न आता सासवडकर नागरिक विचारत आहेत.