ऑनलाइन शॉपिंग करताना एक चुकीची क्लिक खात्यातले पैसे उडवू शकते, या 3 गोष्टी लक्षात ठेवा
ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतेय, त्याचबरोबर फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांचीही संख्या वाढतेय. लिंक तपासणे, कार्ड सेव्ह न करणे आणि दुहेरी लॉक लावणे या तीन गोष्टी पाळल्या तर फसवणूक टाळता येते.
सध्या बरेच जण ऑनलाइन शॉपिंग करतात आणि त्याचसोबत सायबर चोरांची संख्याही खूप वाढली आहे. मोठा डिस्काउंट दाखवून लोकांना फसवायचं, हा त्यांचा नवा धंदा झाला आहे. एका चुकीच्या लिंकवर क्लिक केलं की बँक खातं रिकामं होऊ शकतं. पण घाबरायचं कारण नाही, फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर कोणीही फसवू शकणार नाही.
सगळ्यात आधी लिंक नीट तपासा, म्हणजे URL बघा. चोर मोठ्या कंपन्यांसारख्या दिसणाऱ्या खोट्या वेबसाइट बनवतात. उदाहरणार्थ Amazon ची साईट असेल तर तसंच दिसणारी पण Amazn नावाची साईट बनवली जाते. याला फिशिंग म्हणतात. कुठूनही खरेदी करण्याआधी लिंकच्या सुरुवातीला https:// आहे का ते बघा. यातलं s म्हणजे Secure. लिंकच्या बाजूला कुलुपाचं चिन्ह दिसत असेल तरच ती साईट सुरक्षित समजा. लिंकमध्ये स्पेलिंग चुकलेलं दिसलं, जसं की flipkart ऐवजी flipkart-offer-loot असं काहीतरी असेल, तर तिथे मोबाईल नंबर किंवा बँकेची माहिती अजिबात टाकू नका. ती पूर्णपणे फसवी साईट असते.
दुसरी गोष्ट म्हणजे पेमेंट करताना घाईत डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ॲपवर सेव्ह करून ठेवू नका. पुढच्या वेळी सोपं जाईल म्हणून बरेच जण असं करतात, पण ही सगळ्यात मोठी चूक ठरते. शॉपिंगची साईट हॅक झाली तर कार्डची सगळी माहिती चोरांच्या हातात जाते. त्यामुळे पेमेंट करताना Tokenization हा पर्याय निवडा, यात कार्डचा खरा नंबर लपवला जातो आणि त्याऐवजी वेगळा कोड तयार होतो, त्यामुळे कार्ड सुरक्षित राहतं. शक्य असेल तेव्हा UPI नेच पेमेंट करा, किंवा Cash On Delivery घ्या म्हणजे वस्तू हातात आल्यावरच पैसे द्यावे लागतील. OTP कधीच कोणाला सांगू नका, कारण बँक कधीच OTP मागत नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे दोन लॉक लावा आणि फालतू लिंकवर क्लिक करू नका. WhatsApp किंवा Instagram वर कधीतरी 90% डिस्काउंट किंवा फ्री गिफ्ट मिळाल्याचा मेसेज येतो, अशा लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. त्या लिंकवर क्लिक केलं की मोबाईलमध्ये Malware नावाचा व्हायरस येतो आणि तो बँकेची सगळी माहिती चोरून घेतो. यापासून वाचण्यासाठी सगळ्या शॉपिंग आणि बँकेच्या ॲपला Two-Factor Authentication म्हणजे दुहेरी लॉक लावा, म्हणजे पासवर्ड कोणाला कळला तरी फिंगरप्रिंट किंवा OTP शिवाय खातं उघडता येणार नाही. नेहमी अधिकृत Play Store वरूनच ॲप डाउनलोड करा, बाहेरच्या लिंकवरून कुठलंही ॲप घेऊ नका.
ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली दिसणारा मोठा डिस्काउंट कधीकधी सापळाही असू शकतो हे लक्षात ठेवा. थोडं सावध राहिलात तर पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील.