नाशिकमध्ये विवाहितेचा मृत्यू; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक, सात जणांवर गुन्हा
सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३२ वर्षीय परिचारिकेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पतीला अटक झाली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नाशिकमधील सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका विवाहितेने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळ सहन न झाल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दीपाली अनिल पवार (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दीपाली यांचे पती अनिल पवार यांना अटक केली आहे. अनिल पवार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करतात. यापूर्वी ते दौंड येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत होते. नाशिक न्यायालयाने त्यांना ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली यांनी स्वतःच्या कमाईतून अहिल्यानगर येथे एक फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट दीर सुनील यांच्या नावावर करावा, यासाठी पती आणि सासरचे लोक सतत दबाव आणत होते, असा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून दीपाली यांनी विष घेतले.
विष घेतल्यानंतर दीपाली यांनी स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठले. मात्र उपचारांचा खर्च करण्यास पतीने नकार दिला आणि गंभीर अवस्थेत असलेल्या दीपाली यांना जिल्हा रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडून तो निघून गेला, असा आरोप आहे.
दीपाली जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यांच्या पगाराचे एटीएम कार्ड अनिल यांनी स्वतःकडे ठेवले आणि खात्यातील पैसे काढून घेतले, असा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या शिक्षणासाठी दीपाली यांनी ते कार्ड परत मागितल्यावर त्यांचा छळ आणखी वाढला, असे फिर्यादीत नमूद आहे.
दीपाली यांच्या कामाच्या ठिकाणाहून फोन आला की अनिल त्यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, त्यावरून वाद घालायचे आणि मारहाण करायचे, असाही आरोप आहे. या त्रासामुळे दीपाली यांनी यापूर्वी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.
विष घेतल्यानंतर दीपाली यांनी वडिलांना फोन करून सगळे सांगितले. वडिलांनी लगेच दीपाली यांच्या भावाला नाशिकला पाठवले. भावाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, पण उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
दीपाली यांचे वडील सयाजी गायकवाड (रा. त्र्यंबक) यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पती अनिल पवार, सासू सुशिला, सासरे सोन्याबापू, दीर सुनील, जाऊ सुवर्णा, नणंद रेखा धोत्रे आणि नंदोई किशोर धोत्रे (सर्व रा. घारगाव, श्रीगोंदा) अशा सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे करत आहेत.