नशा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर, मंत्री लोढा यांचे शिक्षक व पालकांना आवाहन
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 'ड्रग्स फ्री मुंबई' कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुलांना 'गुड फ्रेंड' आणि 'बॅड फ्रेंड' यातला फरक समजावण्याचे आवाहन केले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नशेचे व्यसन एकदा शरीरात आणि मनात शिरले, की त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. कितीही उपचार केले तरी त्याचे परिणाम अनेकदा आयुष्यभर वेदना देऊन जातात. म्हणूनच नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर आहे, अशी खंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
सांताक्रुझ पूर्वेकडील कलिना कॅम्पस येथे मुंबई विद्यापीठाचे ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम आहे. तिथे बुधवारी 'सेवा संकल्प अभियानांतर्गत ड्रग्स फ्री मुंबई - विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण' हा कार्यक्रम झाला. त्यावेळी लोढा बोलत होते. नशेपासून स्वतःला आणि पुढच्या पिढीला दूर ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन लढणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
गुड टच आणि बॅड टच समजावतो, तसेच आता 'गुड फ्रेंड' आणि 'बॅड फ्रेंड' यातला फरक समजावून मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे आवाहन लोढा यांनी शिक्षक आणि पालकांना केले.
'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानात शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आणि पोलीस प्रशासन यांनी चांगले काम केले. अशा २१ जणांचा लोढा यांच्या हस्ते सत्कार झाला. उपस्थितांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञाही घेतली.
लोढा पुढे म्हणाले की, या अभियानाची सुरुवात ३० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. नशेतून गुन्हेगारी प्रवृत्तीही समाजात शिरत आहे, त्या धोक्याकडेही लक्ष द्या, असे त्यांनी सांगितले.
आज युद्धाची व्याख्या बदलली आहे, असेही लोढा म्हणाले. तलवार, बंदूक, बॉम्ब किंवा अणुबॉम्बऐवजी नकली नोटा छापून एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करणे, किंवा त्या देशातील तरुण पिढीला नशेच्या आहारी लावणे, ही देखील मोठी आव्हाने आहेत. कुटुंबातला एक तरुण व्यसनाच्या आहारी गेला, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. या संस्था वेगवेगळ्या स्तरांवर नशामुक्त तरुण पिढी घडवण्यासाठी काम करत आहेत. आजपासून त्या एकत्रित प्रयत्नांतून 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानामार्फत शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणार आहेत.
मुंबईचा विकास होत असताना तिला नशेपासून सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे लोढा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'ड्रग्स फ्री भारत'चा संकल्प व्यक्त केला आहे. तरुणांच्या शक्तीवरच विकसित भारताची उभारणी होणार आहे. म्हणून तरुणांनी नशेपासून दूर राहावे आणि 'ड्रग्स फ्री मुंबई' अभियानाला प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. साईगीता चित्तूरू यांनी 'किशोरावस्था' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ब्रम्हकुमारी प्रशांती यांनी 'Be Smart Be Strong Within' या विषयावर मुलांशी संवाद साधला. डिवाईन टच संस्थेच्या प्रतिनिधींनी चांगल्या गोष्टींची योग्य 'निवड' कशी करावी, हे विद्यार्थ्यांना सांगितले.
या वेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई विद्यापीठाचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलीस अधिकारी, संस्था व संघटनांचे प्रतिनिधी, तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.