पारडीत नऊ वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंगाच्या संशयावरून जमावाची मारहाण; आरोपी नारायणदास वैष्णवचा उपचारादरम्यान
नागपूरच्या पारडी भागात सोमवारी रात्री संतप्त जमावाने बेदम मारहाण केलेल्या आरोपीचा मंगळवारी मेयो रुग्णालयात मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका वस्तीत नऊ वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक चाळे करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या संशयावरून स्थानिक जमावाने एका आरोपीला बेदम मारहाण केली होती. सोमवारी घडलेल्या या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या त्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान नारायणदास वैष्णव याचा मंगळवारी, म्हणजे 6 ऑक्टोबरला मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणदास वैष्णव हा मूळचा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी होता आणि सध्या पारडी भागात राहत होता. नऊ वर्षांची मुलगी घराजवळच्या परिसरात खेळायला गेली असताना जवळच राहणाऱ्या वैष्णवने तिला जबरदस्तीने आपल्या घरी नेले आणि तिच्यासोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला, असा संशय आहे. वैष्णवने मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा संशय परिसरातील नागरिकांना होता. तशा आशयाची तक्रार पारडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांची ही कारवाई सुरू असतानाच सोमवारी रात्री परिसरातील संतप्त जमावाने वैष्णव याला गल्लीत गाठले आणि त्याला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. मारहाणीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वैष्णव याला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि मेयो रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान वैष्णव याचा मृत्यू झाला. वैष्णवचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण करणाऱ्या जमावातील संशयितांचा शोध सुरू केला आहे.
जमावाने एखाद्या आरोपीला पकडून मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, अशी नागपुरातील अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी बेलतरोडी परिसरातील मॉडेल मिल कॉलनीत एका धार्मिक कुटुंबाच्या घरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याने वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा परिसरातील नागरिकांनी त्या चोरट्याला पकडून मारहाण केली होती. त्या घटनेतही नंतर चोरट्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जमावाने आरोपीला पकडून मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू होण्याची नागपुरातील ही दुसरी घटना ठरली आहे.