जेएनपीए बंदरातील कोंडी सुटली, गेटवरून कंटेनर ट्रेलर्सची वाहतूक पुन्हा सुरळीत
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या सर्व टर्मिनल्सवर वाढलेला तात्पुरता ताण आता नियंत्रणात आला असून बंदरातील वाहतुकीवर २४ तास प्रत्यक्ष देखरेख ठेवली जात आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या (जेएनपीए) सर्व टर्मिनल्सवर कंटेनर कार्गो हाताळणीत लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही गेल्या काही दिवसांत निर्माण झालेला वाहतुकीचा तात्पुरता ताण आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे, अशी माहिती जेएनपीएकडून देण्यात आली. बंदरातील सर्व टर्मिनल्सच्या प्रवेशद्वारांवर सध्या कोणतीही वाहतूककोंडी नाही आणि कंटेनर ट्रेलर्सची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
कोंडी का झाली, याचे कारण जेएनपीएने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांत एकाच वेळी मोठ्या संख्येने कंटेनर जहाजे बंदरात दाखल झाली. त्याचवेळी १५ हून अधिक जहाजांसाठीचा निर्यात कार्गो एकाच कालावधीत टर्मिनलच्या गेटवर पोहोचला. त्यामुळे कार्गोची आवक मोठ्या प्रमाणात एकवटली. शुक्रवार, २ आणि शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सप्ताह अखेरीच्या काळात या हालचाली वाढल्या. त्यामुळे काही काळ टर्मिनलच्या प्रवेशद्वारांवर वाहनांच्या रांगा लागल्या आणि कंटेनर ट्रेलर्सच्या ये-जा प्रक्रियेत किरकोळ विलंब झाला.
परिस्थितीची तातडीने दखल घेऊन जेएनपीए आणि संबंधित टर्मिनल ऑपरेटर्सनी कंटेनर फ्रेट स्टेशन्स आणि स्थानिक वाहतूक प्राधिकरणांशी समन्वय साधला. त्यानंतर अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या. अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्री तैनात करण्यात आली, तसेच गेट ऑटोमेशनमध्ये सुधारणा केली गेली. या उपायांमुळे कोंडी दूर करण्यात यश आले आणि ४ ऑक्टोबरच्या सकाळपासून बंदरातील वाहतूक पूर्वपदावर आली.
यार्डमधील कार्गोचा ताणही वेगाने कमी झाला आहे. २ ऑक्टोबर रोजी यार्डमध्ये सर्वाधिक १,२०,१७३ टीईयू कार्गो होता आणि त्यावेळी यार्डची क्षमता ६६.८९ टक्के व्यापली होती. कार्गोची जलद उचल आणि निर्गमन वाढल्याने ६ ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण ९४,५१९ टीईयूवर आले, तर यार्डचा वापर ५२.६१ टक्क्यांवर आला. त्यामुळे सर्व टर्मिनल्सच्या यार्डमध्ये आता पुरेशी क्षमता उपलब्ध आहे आणि कार्गो हाताळणी सुरळीत सुरू आहे.
जेएनपीएने स्पष्ट केले आहे की बंदराचे कामकाज आणि सर्व टर्मिनल्सची प्रवेशद्वारे सध्या सुरळीतपणे चालू आहेत. बंदरातील वाहतुकीवर २४ तास प्रत्यक्ष देखरेख ठेवली जात आहे. बंदराकडे येणारे मार्ग आणि टर्मिनल प्रवेशद्वारांवरील वाहतूक सुरळीत आहे. कार्गो वाहतुकीसाठी लागणाऱ्या मार्गांवर कोणताही अडथळा नाही, असे सांगून जेएनपीएने व्यापार क्षेत्रातील भागधारकांना आणि वाहतूकदारांना आश्वस्त केले.
जहाजांची आवक वाढल्याने कंटेनर कार्गो हाताळणीतही मोठी वाढ झाली. ४ ऑक्टोबर रोजी दररोजची समुद्री कंटेनर हाताळणी ३५,३०७ टीईयू होती, तर ५ ऑक्टोबर रोजी ३२,९७२ टीईयू नोंदवली गेली. ही हाताळणी बंदराच्या नियमित दैनंदिन सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक होती. सप्ताहअखेरीच्या काळात विविध टर्मिनल्सवर १६ ते १७ कंटेनर जहाजे एकाच वेळी काम करत होती.
गेटवरील वाहतुकीचे आकडेही जेएनपीएने दिले आहेत. २ ऑक्टोबर रोजी टर्मिनलच्या गेटवरून २१,७९६ टीईयू म्हणजेच १८,३९१ ट्रक, तर ३ ऑक्टोबर रोजी २०,६८४ टीईयू म्हणजेच १७,५३५ ट्रक इतकी वाहतूक झाली. उपाययोजनांनंतर ४ ऑक्टोबर रोजी १९,२९४ टीईयू म्हणजे १६,३३२ ट्रक आणि ५ ऑक्टोबर रोजी १६,९७२ टीईयू म्हणजे १५,०४५ ट्रकची वाहतूक सुरळीतपणे हाताळली गेली. या उपायांमुळे संपूर्ण बंदरातील ट्रकचा सरासरी टर्नअराउंड टाइम कमी होऊन १.४७ तासांवर आला आहे.