हेराफेरीचा आरोप ठेवून तरुणाला मारहाण, चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
नागपुरातील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत हॉस्टलच्या पैशांच्या वादातून एका तरुणाला बोलावून मारहाण करण्यात आली आणि चाकू दाखवत धमकावण्यात आले.
नागपुरातील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाला हॉस्टलच्या पैशांत हेराफेरी केल्याचा आरोप ठेवून मारहाण करण्यात आली आणि चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
36 वर्षीय प्रवीण अंबाडाले हे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि आरोपी एकाच हॉस्टल कंपनीशी संबंधित आहेत. या हॉस्टलमध्ये राहणाऱ्या लोकांकडून दर महिन्याला जे भाडे यायचे, ते प्रवीण यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा व्हायचे. ही रक्कम अकाउंटमध्ये आल्यानंतर प्रवीण ती कॅश स्वरूपात हॉस्टलचे सीनियर कर्मचारी सोनू तिवारी यांच्याकडे जमा करायचे. अशा प्रकारे हॉस्टलचे भाड्याचे व्यवहार प्रवीण आणि सोनू तिवारी यांच्यामार्फत होत असत.
याच भाड्याच्या पैशांवरून हॉस्टलचे मालक सय्यद फैजान यांनी प्रवीण अंबाडाले, सोनू तिवारी आणि हॉस्टलमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्यावर पैशांत हेराफेरी केल्याचा आरोप ठेवला होता. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण हे 19 सप्टेंबरला सदर पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत तक्रार द्यायच्या तयारीत होते. मात्र प्रवीण तक्रार द्यायला जाणार असल्याची कुणकुण आरोपींना लागली आणि त्यांनी प्रवीण यांना कामठी रोडवरील के.के. हॉस्टलसमोरील नारी मेट्रो स्टेशनजवळ बोलावून घेतले.
तिथे आरोपी मोहम्मद सैफान, सय्यद फैजान आणि यश मदने हे तिघे आधीच हजर होते. मोहम्मद सैफानने प्रवीण यांच्या छातीवर लाथ मारली. त्यानंतर तिघांनीही शिवीगाळ करत प्रवीण यांना चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. प्रवीण, ती महिला कर्मचारी आणि सोनू तिवारी या तिघांनी पैशांची हेराफेरी केल्याची कबुली द्यावी, यासाठी आरोपींनी प्रवीण यांच्यावर दबाव आणला आणि या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओसुद्धा काढले.
हे सगळे झाल्यानंतर आरोपींनी प्रवीण यांना गिट्टीखदान भागात नेले आणि तिथल्या पोलीस स्टेशनबाहेर सोडून देऊन ते तिघेही फरार झाले. ही संपूर्ण घटना कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने प्रवीण यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.