एशियन गेम्समध्ये सॉफ्ट टेनिसचे पहिले मेडल, जय मीणाला ब्राँझ
जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेत जय मीणाने पुरुषांच्या सॉफ्ट टेनिस प्रकारात कांस्यपदक जिंकले, सॉफ्ट टेनिसमधील भारताचे हे पहिलेच मेडल आहे.
जपानमध्ये सध्या एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे आणि यात भारतीय खेळाडूंची कामगिरी उजवी ठरतेय. याच स्पर्धेत भारताच्या जय मीणाने पुरुषांच्या सॉफ्ट टेनिस प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरत नवा इतिहास घडवला आहे. एशियन गेम्सच्या इतिहासात सॉफ्ट टेनिस या खेळात भारताला मिळालेले हे पहिलेवहिले मेडल ठरले आहे. जय मीणाच्या या कामगिरीमुळे भारतीय क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे आणि त्याच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय.
क्वार्टर फायनलमध्ये जय मीणाचा सामना फिलिपिन्सच्या शेरविन नुगुइटशी झाला होता. या सामन्यात त्याने प्रचंड संयम आणि कौशल्य दाखवत जबरदस्त खेळ केला. निर्णायक गेममध्ये तो 3-5 असा पिछाडीवर गेला होता, पण दबावाखालीही त्याने खचून न जाता सलग 4 पॉईंट्स मिळवले आणि हा सामना 4-3 असा जिंकत सेमीफायनलमध्ये धडक मारली. सेमीफायनलमध्ये जय मीणाची गाठ जपानच्या टॉप खेळाडू ताकुया कुरोसाकाशी पडली. या टप्प्यातील कामगिरीनंतर त्याला कांस्यपदक मिळाले असून, त्यामुळे भारतीय क्रीडा इतिहासात त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी जय मीणाचे ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील हा नवा अध्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एशियन गेम्स 2026 मधील पुरुष एकेरी सॉफ्ट टेनिस प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्यांनी जय मीणाचे मनापासून अभिनंदन केले. या ऐतिहासिक कामगिरीसह जयने सॉफ्ट टेनिसमध्ये भारताचे पहिलेवहिले एशियन गेम्स मेडल जिंकले असल्याचे रिजिजू यांनी नमूद केले आणि जय व भारतीय सॉफ्ट टेनिससाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीच्या काळात जय मीणाला क्रिकेटची प्रचंड आवड होती आणि त्याला व्यावसायिक क्रिकेटर व्हायचे होते. मात्र देवास येथील पायनियर पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. शाळेतील सॉफ्ट टेनिस कोर्टने त्याचे लक्ष वेधून घेतले. बॉल बॉय म्हणून काम करताना त्याची या खेळातली आवड वाढत गेली आणि त्याने स्वतः रॅकेट हातात घेतले. शाळा आणि जिल्हास्तरीय स्पर्धांपासून सुरुवात करत त्याने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखवली. याच कौशल्याच्या जोरावर अवघ्या 14 व्या वर्षी त्याला जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती.
दरम्यान, महिला नेमबाजी संघानेही 2026 च्या एशियन गेम्समध्ये भारताला आठवे मेडल मिळवून दिले आहे. बुधवारी महिलांच्या स्किट सांघिक प्रकारात भारताने कांस्यपदक पटकावले. जपानच्या आयची-नागोया येथे भारताने आतापर्यंत एकूण आठ पदके जिंकली असून, त्यापैकी सहा पदके नेमबाजी खेळातील आहेत.