Asian Games 2026: बांगलादेशला भारताच्या कबड्डी संघापुढे टिकताच आले नाही! सेमीफायनलमध्ये दणदणीत धडक
जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स २०२६ स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने बांगलादेशला ४८-२५ असे हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि पदकही पक्के केले.
सध्या जपानमध्ये एशियन गेम्स २०२६ ही मोठी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपला विजयी सिलसिला कायम ठेवला आहे. बांगलादेशला पराभूत करत भारताने स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये एंट्री केली असून, या दमदार कामगिरीमुळे संघाने पदकही पक्के केले आहे. सेमीफायनलपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक संघाला किमान एक पदक निश्चित होत असल्याने, भारताच्या खेळाडूंनी आणखी एका पदकावर आपले नाव कोरले आहे.
कर्णधार सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी टोकाई सिटिजन्स जिम्नेजियम इथे झालेल्या 'ग्रुप ए'च्या सामन्यात बांगलादेशला ४८-२५ असे पूर्णपणे धुळ चारली. या मोठ्या फरकाच्या विजयाने भारतीय संघाच्या ताकदीची पुन्हा एकदा प्रचिती आली.
या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत जबरदस्त छाप सोडली असून, ग्रुप स्टेजमधला हा भारताचा सलग तिसरा विजय ठरला आहे. भारताने स्पर्धेची सुरुवात जपानविरुद्धच्या दणदणीत विजयाने केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाला ६३-३१ अशा मोठ्या फरकाने हरवलं. आता बांगलादेशवर मात करत भारताने थाटामाटात सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे. जपान, दक्षिण कोरिया आणि बांगलादेश या तिन्ही संघांविरुद्ध सलग विजय मिळवत भारताने ग्रुप स्टेजमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे कबड्डीत आणखी एका पदकावर भारताचं नाव कोरलं गेलं असून, आता सगळ्या चाहत्यांच्या नजरा सुवर्णपदकाकडे लागल्या आहेत.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय रेडर्सनी बांगलादेशी डिफेंडर्सची पार दाणादाण उडवली. आक्रमक चढाया करत भारतीय खेळाडूंनी यशस्वी रेड्समधून १८ पॉईंट्स आणि ७ महत्त्वाचे बोनस पॉईंट्स कमावले. भारताच्या मजबूत डिफेन्समुळे बांगलादेशच्या खेळाडूंना काहीच करता आलं नाही. भारताच्या आक्रमक खेळामुळे बांगलादेशला गेममध्ये परत येणं शक्यच झालं नाही. बांगलादेशने एका 'सुपर टॅकल'द्वारे १ गुण मिळवत पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण भारतीय संघाच्या आक्रमक खेळासमोर त्याचा फारसा फरक पडला नाही. पहिल्या हाफमध्येच भारताने मोठी आघाडी घेतल्याने बांगलादेशसाठी सामना कठीण होत गेला.
सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये बांगलादेशच्या संघाने थोडंफार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आक्रमक चढाया करत रेडिंगमधून ८ पॉईंट्स आणि ८ बोनस पॉईंट्स मिळवले. मात्र पहिल्या हाफमधली भारताची मोठी आघाडी आणि मैदानावरची संतुलित रणनीती यांच्यासमोर बांगलादेशचे हे प्रयत्न अपुरे पडल्याचं दिसून आलं. अखेर भारतीय संघाने सामना ४८-२५ असा जिंकत सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.