मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 03:34 IST

ड्रग्ज तस्कराच्या मागे धावताना पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे कर्मचारी जावेद बागसिराज यांचा अमली पदार्थ विरोधी कारवाईदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

ड्रग्ज तस्कराच्या मागे धावताना पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अमली पदार्थ विकायला आलेल्या दोन गुन्हेगारांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात ते सहभागी होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

रविवारी (२५ ऑक्टोबर) रात्री उशिरा अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी परिसरात हा सापळा लावला होता. त्या रात्री जावेद यांना एक टीप मिळाली होती. दोन संशयित संत तुकाराम नगर येथे एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार आहेत, असे त्या टीपमध्ये सांगितले होते. जावेद यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली आणि संत तुकाराम नगरमधील आंतरिक सोसायटीजवळ सापळा लावला.

एमडी विकायला आलेल्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी पकडले. तेवढ्यात पकडलेल्या संशयित आरोपीचा दुसरा साथीदार तिथून पळू लागला. त्याला पकडण्यासाठी जावेद त्याच्या मागे धावले. धावत असतानाच त्यांच्या छातीत अचानक तीव्र कळ आली आणि ते खाली कोसळले.

सहकाऱ्यांच्या हे लगेच लक्षात आले. त्यांनी जावेद यांना तात्काळ पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. पण त्याच वेळी त्यांना आणखी एकदा हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जावेद यांचे कुटुंब मूळचे कर्नाटक राज्यातले आहे. त्यांचे वडील पुणे शहरात येऊन राहिले आणि जावेद यांचा जन्म पुणे शहरातच झाला. ते २०१० मध्ये पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. सुरुवातीची आठ वर्षे त्यांनी पुणे पोलीस दलातील हडपसर आणि मुंढवा पोलीस ठाण्यांत सेवा केली.

२०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले. त्यानंतर जावेद पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात आले. इथे त्यांनी सुरुवातीला पिंपरीत आणि त्यानंतर गुन्हे शाखेत काम केले. सध्या ते गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक्स सेलमध्ये कार्यरत होते.

जावेद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १२ वर्षांची एक मुलगी आणि ७ वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे. सोमवारी दुपारी कसबा येथील कब्रिस्तानमध्ये त्यांचा दफनविधी झाला.

जावेद अतिशय कष्टाळू होते, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. त्यांचे काम वाखाणण्याजोगे असल्याच्या भावना हे अधिकारी व्यक्त करत आहेत. एका संशयिताच्या मागे धावता धावता जावेद यांनी प्राण गमावले, याचे दुःख पोलीस दलात सगळ्यांनाच आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ