मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

धनत्रयोदशीला सोनंच हवं असं नाही; पितळ, तांबं, धणे यांची खरेदीही शुभ मानली जाते

धनत्रयोदशीला सोनंच हवं असं नाही; पितळ, तांबं, धणे यांची खरेदीही शुभ मानली जाते छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

सोनं घेणं चांगलं मानलं जातं, पण ते बंधनकारक नाही, असं धर्मशास्त्रानुसार सांगितलं जातं. सोन्याऐवजी कोणत्या वस्तू शुभ मानल्या जातात, त्याची माहिती.

हिंदू धर्मशास्त्रात आणि भारतीय संस्कृतीत धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती) या सणाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र अनेकांचा असा समज असतो की या दिवशी फक्त सोनं किंवा चांदीच घेतली पाहिजे. धर्मशास्त्र याबद्दल काय सांगते आणि सोन्याऐवजी कोणत्या वस्तू घ्याव्यात, ते पाहू.

धर्मशास्त्रानुसार धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं चांगलं मानलं जातं, पण ते अनिवार्य किंवा बंधनकारक अजिबात नाही. धर्मशास्त्रात 'धन' म्हणजे केवळ पैसा किंवा सोनं-चांदी नव्हे. आरोग्य, समृद्धी, अन्नधान्य आणि समाधान हेही धनाचाच भाग आहेत. त्यामुळे आर्थिक क्षमतेच्या बाहेर जाऊन, कर्ज काढून किंवा मानसिक ताण घेऊन सोनं घेण्याची गरज नाही. श्रद्धा आणि आनंद यांना महत्त्व आहे, वस्तूच्या किंमतीला नाही.

या पवित्र दिवशी सोनं घ्यायचं नसेल किंवा बजेट नसेल, तर धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार पुढच्या वस्तू घेणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.

पितळ किंवा तांब्याची भांडी : धनत्रयोदशी हा प्रामुख्याने भगवान धन्वंतरी (आरोग्याचे देवता) यांचा प्रकटीकरण दिवस आहे. ते समुद्रमंथनातून प्रकट झाले, तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला पितळाचा कलश होता. म्हणून या दिवशी पितळ (Brass) किंवा तांब्याचे (Copper) भांडे अथवा पाण्याचा कलश घेणं सोन्याइतकंच शुभ मानले जाते.

चांदीच्या वस्तू किंवा नाणी : सोनं परवडत नसेल तर चांदीचं लहान नाणं, चांदीचा दिवा किंवा चमचा घेता येतो. चांदी पवित्र आणि मनाला शांतता देणारी धातू मानली जाते.

अख्खे धणे : धनत्रयोदशीला धणे घेण्याची जुनी परंपरा आहे. धणे समृद्धीचं प्रतीक मानले जातात. थोडे अख्खे धणे घेऊन ते दिवाळीच्या पूजेत लक्ष्मीमातेसमोर ठेवावेत. भाऊबीजेनंतर हे धणे घरातील कुंडीत किंवा बागेत पेरावेत. धण्याची रोपं जशी वाढतात, तशी घरातली समृद्धी वाढते, अशी मान्यता आहे.

खडीसाखर आणि बत्तासे : लक्ष्मीपूजनासाठी आणि नैवेद्यासाठी या दिवशी खडीसाखर, बत्तासे किंवा लाह्या घेणं शुभ असतं.

नवीन झाडू : झाडूला 'लक्ष्मी'चं रूप मानलं जातं. झाडू घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर काढतो, असं सांगितलं जातं. धनत्रयोदशीला नवीन झाडू घेऊन त्याची पूजा केली जाते, त्यामुळे घरात स्वच्छता आणि सकारात्मकता नांदते.

मातीचे दिवे आणि लक्ष्मी-गणेश मूर्ती : दिवाळीच्या पूजेला लागणारे मातीचे दिवे, पणत्या आणि लक्ष्मी-गणेशाची नवीन मूर्ती किंवा फोटो या दिवशी घ्यावा.

आरोग्य हेच धन : समुद्रमंथनातून वैद्यराज धन्वंतरी प्रकट झाले, म्हणून या दिवशी आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. शास्त्र सांगते की 'पहिलं सुख निरोगी काया', म्हणजेच चांगलं आरोग्य हेच सर्वात मोठं धन आहे.

यमदीपदान : या दिवशी संध्याकाळी घराबाहेर यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो, त्याला यमदीपदान म्हणतात. यामुळे कुटुंबातील सदस्यांचं अकाली मृत्यूपासून रक्षण होते, असे शास्त्र सांगते.

पौराणिक कथा : राजा हेमा यांच्या पुत्राला लग्नानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येईल असा शाप होता. त्याच्या पत्नीने त्याला अपमृत्यूपासून वाचवण्यासाठी विवाहानंतरच्या चौथ्या दिवशी रात्री महालात सोन्या-नाण्यांचे ढीग लावले आणि चारही बाजूंनी दिवे उजळले. दिव्यांच्या लखलखाटाने आणि सोन्याच्या चकाकीने सर्पवेषात आलेल्या यमराजांचे डोळे दिपले आणि ते आत येऊ शकले नाहीत. त्यामुळे राजकुमाराचे प्राण वाचले. तेव्हापासून या दिवशी दिवे लावण्याची आणि यमपूजनाची प्रथा सुरू झाली.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ