मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 317 | Very Poor 21:47 IST

कोठारीत झोपलेल्या सासऱ्यावर पेट्रोल ओतले, जावई राहुल रामटेके पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी येथे कौटुंबिक वादातून जावयाने ६५ वर्षीय सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.

कोठारीत झोपलेल्या सासऱ्यावर पेट्रोल ओतले, जावई राहुल रामटेके पोलिसांच्या ताब्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६५ वर्षांचे दिवाकर मावलीकर झोपलेले असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतल्याचा आरोप आहे. कुटुंबातील लोकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी राहुल दत्तात्रय रामटेके याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कोठारीतील वार्ड क्रमांक ४ मध्ये राहणारे निखील दिवाकर मावलीकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तोंडी तक्रार दिली. त्यांची बहीण दीपिका ३४ वर्षांची असून ती वन विकास महामंडळात राऊड ऑफिसर म्हणून बामणी-तळोधी येथे नोकरी करते. तिचा पती राहुल रामटेके ३८ वर्षांचा असून कोठारीचाच रहिवासी आहे. तो खाजगी ठेकेदारीचे काम करतो. दीपिका गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रसूती रजेवर असल्याने माहेरी कोठारीत राहत होत्या.

या वादाची सुरुवात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी झाली होती. त्या दिवशी दीपिका पतीकडे गेल्या असताना व्हॉट्सअॅपचे स्टेटस का पाहिले नाही, या कारणावरून राहुलने त्यांच्याशी भांडण करून मारहाण केली. निखील भांडण सोडवायला गेले, तेव्हा राहुलने त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले होते. तेव्हा गुन्हा दाखल झाल्यापासून दीपिका माहेरीच राहत होत्या.

सोमवारी, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दीपिका आपले कपडे आणि सामान आणण्यासाठी पतीच्या घरी गेल्या. राहुलने काहीही द्यायला स्पष्ट नकार दिल्याने त्या परत आल्या. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दीपिका आणि कुटुंबीय घरात असताना राहुलने दीपिका यांच्या मोबाईलवर "मर्डर करायला येत आहोत" असा धमकीचा मेसेज पाठवला. तो वाचताच कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले.

मेसेजनंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत राहुल गेट उघडून थेट घरात घुसला. त्या वेळी निखील यांचे वडील दिवाकर बाबुराव मावलीकर पोर्चमधील बाजेवर मोबाईल पाहत झोपले होते. "मी एका-एकाला जाळून व चाकुने कापून मारून टाकतो," असे मोठ्याने ओरडत राहुलने प्लास्टिकच्या बाटलीतून आणलेले पेट्रोल झोपलेल्या सासऱ्याच्या अंगावर ओतले. खिशातून माचीस काढून तो त्यांना पेटवणार होता, तेवढ्यात निखील आणि दीपिका यांनी धाव घेऊन त्याला झडप घालून पकडले.

झटापटीत राहुलने कंबरेतून धारदार चाकू काढला, पण दीपिका यांनी प्रसंगावधान राखून तो त्याच्या हातातून हिसकावून बाजूला फेकला. आरडाओरड ऐकून शेजारचे नातेवाईक सपना संजय चांदेकर, संयम उर्फ निक्की चांदेकर आणि रियाज शेख धावून आले आणि त्यांनी राहुलला पकडून ठेवले. त्याच वेळी निखील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची माहिती दिली.

माहिती दिल्यानंतर राहुल तेथून पळण्याचा प्रयत्न करू लागला, पण निखील यांनी त्याला घराबाहेर पुन्हा पकडले. संतापलेल्या राहुलने त्यांना तोंडावर चापटा-बुक्क्यांनी मारले आणि डाव्या हाताला दाताने जोरदार चावा घेऊन गंभीर जखमी केले. थोड्याच वेळात कोठारी पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी राहुल दत्तात्रय रामटेके याला ताब्यात घेतले.

निखील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३३३, ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि १०९(१) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आत्माराम इंगळे करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ