चंद्रपूरमध्ये दुष्काळाचा फटका, दिवाळी तोंडावर पण शेतकऱ्यांना अजून मदत नाही
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दुष्काळी नुकसानभरपाई आणि पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दोन्ही अजून खात्यात आलेले नसल्याने शेतकरी कुटुंबे चिंतेत आहेत.
धाबा : यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आणि आता दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. तरीही दुष्काळी नुकसानभरपाई अजून मिळालेली नाही. शासनाने जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतकरी कुटुंबांपुढे उभा आहे, आणि शासनाच्या या उशिराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
यंदा पाऊस अनियमित राहिल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला. सुरुवातीला पेरणीला पुरेसा पाऊस झाला, म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. पण नंतर पावसाने बराच काळ उघडीप दिली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली, जमिनीतला ओलावा कमी झाला आणि हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाळून गेली.
बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरी यावर केलेला खर्चही परत मिळण्याची शक्यता उरलेली नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. दुष्काळाची तीव्रता पाहून शासनाने चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण दुष्काळ जाहीर होऊनही प्रत्यक्ष मदतीची वाट पाहणे सुरूच आहे. नुकसानभरपाईची रक्कम कधी मिळणार, हे स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना निदान सणाचा खर्च भागवता येईल, असे वाटले होते. पण दिवाळी जवळ आली तरी ही रक्कम खात्यात आलेली नाही. घोषणेचा प्रत्यक्ष फायदा कधी मिळणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
दिवाळी म्हटले की मुलांचे कपडे, फराळाचे साहित्य, किराणा आणि इतर खर्च आलेच. शेतीतून उत्पन्नच मिळाले नसल्याने या खर्चाची सोय करणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. एकीकडे शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची चिंता आणि दुसरीकडे सण साजरा करण्याचे आव्हान, अशा दुहेरी संकटात शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.
खराळपेठ येथील शेतकरी विनोद दुर्गे म्हणाले, "शेतकऱ्यांना आता आश्वासन नको, तर प्रत्यक्ष मदत हवी आहे. जाहीर केलेले पाच हजार रुपये तातडीने खात्यात जमा करावेत आणि दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी."
संकटाच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे अपेक्षित आहे. घोषणा होऊनही प्रत्यक्ष लाभ मिळत नसेल, तर त्याचा उपयोग काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. दिवाळीपूर्वी जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे आणि दुष्काळी नुकसानभरपाईही उशीर न करता द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.