आगरकरांनी स्वतःहून सोडलं मुख्य निवडकर्ता पद, सैकियांचं मोठं विधान
बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीनंतर अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
बीसीसीआयची वार्षिक बैठक नुकतीच पार पडली आणि त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बोर्ड आता नवीन मुख्य निवडकर्त्याच्या शोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे. यापूर्वी अशी बातमी होती की बीसीसीआय अजित आगरकर यांचा करार वाढवणार नाही. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीच स्वतःहून आपला कार्यकाळ न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना या पदावर पुढे काम करण्याची इच्छा नसल्याचं कळतंय.
दुसरीकडे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही आगरकर यांच्या भविष्याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.
बीसीसीआय लवकरच नवीन मुख्य निवडकर्ता निवडण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कळवलं आहे की त्यांना आता मुख्य निवडकर्ता म्हणून काम करायचं नाही. आगरकर यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की त्यांनी हा निर्णय बीसीसीआयला कळवला आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत, कारण त्यांचा करार ४ ऑक्टोबर रोजी संपणार आहे.
काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय आगरकर यांचा करार एका वर्षासाठी वाढवण्याचा विचार करत असल्याची बातमी होती. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाकडे बघून यावर चर्चा झाली होती. पण लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्माने भारतीय संघ सोडल्याच्या बातमीने खळबळ उडाली आणि त्यानंतर बीसीसीआय व आगरकर यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरू झाली.
बीसीसीआयच्या वार्षिक सभेनंतर सचिव देवजित सैकिया म्हणाले की, आगरकर यांना पदावर कायम ठेवायचं की हटवायचं यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यांच्या कार्यकाळाला अजून १५ दिवस शिल्लक असून, क्रिकेटमध्ये १५ दिवस हा मोठा काळ असतो, त्यामुळे बोर्ड योग्य वेळी आपला निर्णय जाहीर करेल, असं ते म्हणाले. या बैठकीत कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबाबत चर्चा झाली नसल्याचंही सैकिया यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर सैकिया यांनी आशिया कपच्या दोन्ही ट्रॉफी बीसीसीआय कार्यालयात आणण्याबाबतही सांगितलं.
बीसीसीआय लवकरच सिनियर सिलेक्शन कमिटीसाठी नवीन अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. यासोबतच ज्यूनियर सिलेक्शन कमिटीतील सर्व पाच पदांसाठीही निवडकर्त्यांचा शोध सुरू आहे. सैकिया यांनी सांगितलं की ज्यूनियर सिलेक्शन कमिटीसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले असून ही प्रक्रिया पुढील दोन आठवड्यांत पूर्ण केली जाईल.
२०२३ मध्ये अजित आगरकर यांची भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य निवडकर्तापदी नियुक्ती झाली होती आणि त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. त्यांची जागा कोण घेणार, हा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल या शर्यतीत आघाडीवर आहेत.