झोपेतून उठल्यावर बोलता येईना? स्ट्रोकचे मूळ हृदयातही असू शकते, डॉ. रंजन यांचा इशारा
सकाळी उठल्यावर अचानक बोलता न येणे, चेहरा वाकडा होणे किंवा हातापायांत कमजोरी जाणवणे ही स्ट्रोकची लक्षणे असू शकतात. काही वेळा त्याची सुरुवात हृदयात तयार झालेल्या गुठळीतून होते.
रात्री झोपताना काहीच त्रास नसतो आणि सकाळी उठल्यावर अचानक बोलता येत नाही, चेहरा एका बाजूला वाकडा दिसतो किंवा हातापायांत कमजोरी जाणवते. असं झालं की नेमकं काय झालं, हे अनेकांना कळत नाही. पण ही स्ट्रोकची लक्षणे असू शकतात. विशेष म्हणजे, काही वेळा स्ट्रोकची सुरुवात मेंदूत नाही, तर हृदयात तयार झालेल्या रक्ताच्या गुठळीमुळे होते. झोपेत स्ट्रोक येऊन सकाळी त्याची लक्षणे दिसण्याला वैद्यकीय भाषेत 'वेक-अप स्ट्रोक' म्हणतात.
पुण्यातील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या न्यूरोसायन्सेस विभागाचे वरिष्ठ संचालक आणि न्यूरोसर्जन डॉ. राकेश रंजन यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, "स्ट्रोक हा फक्त मेंदूशी संबंधित आजार आहे, असा अनेकांचा समज असतो. प्रत्यक्षात हृदयाच्या काही आजारांमुळेही स्ट्रोकचा धोका वाढतो. अनेकदा या हृदयविकारांची स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे सकाळी उठल्यावर स्ट्रोकची लक्षणे आढळली, तरी उपचारासाठी उशीर झाला असे समजू नये. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाला योग्य उपचार मिळू शकतात."
हृदयाचे ठोके अनियमित होण्याच्या समस्येला 'अॅट्रियल फिब्रिलेशन' म्हणतात. यात हृदयाच्या वरच्या कप्प्यांमध्ये रक्त साचून गुठळी तयार होऊ शकते. ती गुठळी रक्तप्रवाहातून मेंदूपर्यंत गेली, तर रक्तवाहिनी बंद होते आणि स्ट्रोक येऊ शकतो. अॅट्रियल फिब्रिलेशनमुळे स्ट्रोकचा धोका सुमारे पाचपट वाढू शकतो. हृदयाच्या झडपांचे विकार आणि इतर काही हृदयविकारही याला कारणीभूत ठरू शकतात.
वेक-अप स्ट्रोकमध्ये सगळ्यात मोठी अडचण म्हणजे स्ट्रोक नेमका कधी आला, हे कळत नाही. रात्री झोपल्यापासून सकाळी लक्षणे दिसेपर्यंत किती वेळ गेला, याचा अंदाज लावणे कठीण असते. तरीही आधुनिक सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासण्यांतून मेंदूतील रक्तवाहिन्यांची स्थिती आणि मेंदूचा कोणता भाग प्रभावित झाला आहे, याची माहिती मिळू शकते. त्यानुसार निवडक रुग्णांना रक्ताची गुठळी विरघळवणारी औषधे दिली जातात किंवा 'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी'ने गुठळी काढली जाते.
स्ट्रोकची लक्षणे ओळखायला 'बी फास्ट' (BE FAST) ही पद्धत उपयोगी ठरते. अचानक तोल जाणे, दृष्टी धूसर होणे, चेहरा वाकडा होणे, हातात कमजोरी येणे किंवा बोलताना अडचण येणे ही स्ट्रोकची मुख्य लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसताच रुग्णवाहिका बोलवून उपचारांची सोय असलेल्या रुग्णालयात रुग्णाला नेणे गरजेचे आहे.
काही वेळाने लक्षणे कमी झाली, तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. तो भविष्यातील गंभीर स्ट्रोकचा इशारा असू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अॅस्पिरिनसारखी औषधे देऊ नयेत. तसेच रुग्णाला खायला किंवा प्यायला काहीही देणे टाळावे.
स्ट्रोकचा धोका कमी करायचा असेल, तर रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, नियमित व्यायाम करणे, तंबाखू टाळणे आणि हृदयाची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. हृदयाचे ठोके अनियमित असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.
स्ट्रोक अचानक येतो, तरी त्यामागचा धोका अनेकदा आधीपासून असतो. हृदय आणि मेंदू यांच्यातला संबंध समजून घेणे, लक्षणे वेळेत ओळखणे आणि तातडीने उपचार घेणे यामुळे रुग्णाचा जीव वाचतो, तसेच कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोकाही कमी करता येऊ शकतो, असे डॉ. रंजन यांनी स्पष्ट केले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.