बीड, ठाणेसह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल; बीडचे न्यायालय रिकामे
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली आणि अहिल्यानगरच्या सत्र न्यायालयांना धमकीचा ई-मेल आल्याची माहिती आहे. बीडमध्ये खबरदारी म्हणून न्यायालय रिकामे करण्यात आले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतील सत्र न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. ठाणे, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली आणि अहिल्यानगर येथील सत्र न्यायालयांना धमकीचा ई-मेल आल्याची माहिती आहे. या सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून बॉम्बशोधक पथकांनी तपास सुरू केला आहे.
बीडमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाला असा ई-मेल आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. धमकीची माहिती कळताच खबरदारी म्हणून संपूर्ण न्यायालय रिकामे करण्यात आले. बॉम्बशोधक पथक आणि पोलीस अधिकारी तिथे पोहोचले असून न्यायालयाच्या परिसरात तपासणी सुरू आहे. न्यायालयाचे कामकाज शक्य तितक्या लवकर पूर्ववत व्हावे, यासाठी प्रयत्न चालू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश शिंदे यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हा ई-मेल आला. त्यात न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याचा उल्लेख होता. ई-मेलचे गांभीर्य ओळखून सुरक्षा यंत्रणांना लगेच सावध करण्यात आले. न्यायालयात त्या वेळी असलेले सर्व वकील, पक्षकार, कर्मचारी आणि नागरिक यांना सुरक्षितपणे बाहेर काढून संपूर्ण परिसर खाली करण्यात आला.
ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, बॉम्बशोधक नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथक कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले आहेत. संशयित ठिकाणी पथकाकडून कसून तपासणी आणि शोधमोहीम सुरू आहे. हा संदेश कोणी आणि कुठून पाठवला, हे शोधण्यासाठी सायबर पोलिसांचे पथक तांत्रिक तपास करत आहे. ई-मेलमध्ये किती तथ्य आहे, हेही तपासले जात आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी सांगितले, "ईमेल आल्यानंतर आमच्या टीमकडून बॉम्बचा शोध घेतला जात आहे. आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सायबर पोलिसांकडूनही तपास सुरू आहे. यामध्ये नक्की काय तथ्य आहे, याचा शोध घेतला जात असून आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर न्यायालयाचे काम पूर्ववत सुरू व्हावे." बीड पोलिसांनी नागरिकांना आणि वकिलांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. न्यायालयाच्या परिसरात गर्दी न करता सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सातारा आणि बीडनंतर आता ठाणे सत्र न्यायालयालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. ठाण्यातही ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. ती कळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या. पोलिसांनी खबरदारी म्हणून न्यायालय परिसर रिकामा करून घेतला. तिथे उपस्थित असलेले कर्मचारी, वकील आणि नागरिक यांना सुरक्षेसाठी बाहेर काढण्यात आले आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली.
ठाण्यातही पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) बोलावले. पथक न्यायालय परिसरात संशयास्पद वस्तूंची तपासणी करत आहे. मात्र हा ई-मेल नेमका कुठून पाठवला गेला, धमकीत किती तथ्य आहे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सापडले आहे का, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राज्यातील वेगवेगळ्या न्यायालयांना अशा धमक्या मिळत असल्यामुळे न्यायालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. या धमकीमागे कोण आहे आणि त्यामागचा उद्देश काय आहे, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.