मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी आयकर निरीक्षक अटकेत; येवल्यात 1500 रुपये घेताना तलाठी रंगेहात पकडला
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबईत 15 लाखांची लाच घेताना आयकर निरीक्षकाला सीबीआयने अटक केली, तर येवल्यात 1500 रुपयांची लाच घेताना तलाठ्याला लाचलुचपत विभागाने पकडले.
राज्यातील सरकारी कार्यालयांत आणि अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या लाचखोरीच्या घटना दिवसेंदिवस उजेडात येत आहेत. आज मुंबई आणि नाशिक जिल्ह्यात लाचेच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत कारवाई झाली. मुंबईत 15 लाख रुपयांची लाच घेताना एका आयकर निरीक्षकाला सीबीआयने रंगेहाथ अटक केली. तर नाशिक जिल्ह्यातील येवला येथे 1500 रुपयांची लाच घेताना एका तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
मुंबईतील प्रकरणात बेनामी मालमत्तेचे प्रकरण बंद करण्यासाठी 20 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये तडजोड झाली आणि रक्कम 15 लाख रुपयांवर आली. ही रक्कम स्वीकारत असताना सीबीआयने सापळा रचला आणि आयकर अधिकाऱ्यावर अटकेची कारवाई केली.
अटकेनंतर आरोपीच्या घरात झाडाझडती घेण्यात आली. त्यातून 11 लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हा आरोपी आयकर विभागाच्या स्किंडिया हाऊस येथील तपास विभागात काम करतो.
सीबीआयने आरोपीला न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुंबईतील सक्षम न्यायालयाने त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.
दुसरे प्रकरण नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील चिचोंडी येथील आहे. तेथील तलाठी राहुल रिंढे यांना 1,500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे. सात-बारा उताऱ्यावर नोंदी करण्यासाठी तलाठ्याने एका शेतकऱ्याकडे 2000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, असा आरोप आहे.
या मागणीबाबत तक्रार करण्यात आल्यानंतर कारवाईसाठी सापळा रचण्यात आला. त्यानुसार तडजोडीअंती ठरलेली 1500 रुपयांची लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी तलाठ्याला कार्यालयातच रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासकीय क्षेत्रातही लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडकी भरल्याचे चित्र आहे. राज्यात एसीबीने कारवायांचा धडाका लावला असून गेल्या काही महिन्यांत लाच घेतल्याप्रकरणी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.