मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

लग्नाच्या चार वर्षांनी महालक्ष्मीची इन्स्टाग्राम पोस्ट, ट्रोलर्सना उत्तर आणि तिरुपतीची आठवण

लग्नाच्या चार वर्षांनी महालक्ष्मीची इन्स्टाग्राम पोस्ट, ट्रोलर्सना उत्तर आणि तिरुपतीची आठवण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
कल्चर PT24 टीम

दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी शंकरन यांनी निर्माते पती रविंदर चंद्रशेखरन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल पोस्ट लिहून ट्रोलर्सना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी शंकरन आणि त्यांचे पती, निर्माते रविंदर चंद्रशेखरन हे लग्न झाल्यापासूनच चर्चेत आहेत. लग्नाला आता चार वर्षे झाली आहेत आणि हे जोडपं पुन्हा एकदा बातम्यांत आलं आहे. महालक्ष्मी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. रविंदर यांच्यासोबतची आपली प्रेमकहाणीही त्यांनी सांगितली आहे.

इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टमध्ये महालक्ष्मी यांनी नात्याबद्दल मनातल्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, "हे सर्वकाही तिरुपतीपासूनच सुरू झालं होतं. आमचं आयुष्य, आमचा प्रवास आणि एक नवीन सुरुवात याच ठिकाणापासून झाली."

प्रेमाविषयी लिहिताना त्यांनी म्हटलं की, इतर लोक आपल्या नात्याकडे कोणत्या नजरेने पाहतात, काय बोलतात किंवा कोणत्या कमेंट्स करतात, याला प्रेम म्हणता येत नाही. आपल्याला एकमेकांबद्दल काय वाटतं, आपण एकमेकांची किती काळजी घेतो आणि एकमेकांना कसं सुरक्षित ठेवतो, हेच खरं प्रेम आहे. या पोस्टमधून त्यांनी ट्रोलर्सना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

दोघांची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्या चित्रपटाचे निर्माते रविंदर होते आणि महालक्ष्मी त्यात अभिनय करत होत्या. एकत्र काम करता करता दोघांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. रविंदर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, लग्नापूर्वी ते दोघे सुमारे दीड वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

अखेर १ सप्टेंबर २०२२ रोजी दोघांनी तिरुपती येथे लग्न केलं. कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी या वेळी उपस्थित होते. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर या जोडप्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. महालक्ष्मी यांचं पहिलं लग्न अनिल कुमार यांच्याशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगा आहे. काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

२०२२ मध्ये लग्नाचे फोटो समोर आल्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी जोडप्याचं अभिनंदन केलं, तर काहींनी महालक्ष्मी यांनी पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप केला. रविंदर यांच्या वजनावरून आणि दिसण्यावरूनही टीका झाली. दोघांच्या वयात २० वर्षांचं अंतर असल्याची चर्चाही रंगली होती. लग्नाच्या वेळी रविंदर यांचं वय ५२ आणि महालक्ष्मी यांचं वय ३२ असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हा दावा चुकीचा असून आपल्यात फक्त सहा वर्षांचं अंतर आहे, असं जोडप्याने स्पष्ट केलं होतं.

रविंदर यांच्या दिसण्यावरून किंवा वजनावरून होणाऱ्या टीकेला महालक्ष्मी यांनी यापूर्वीही विरोध केला होता. ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून त्यांनी नेहमी पतीची साथ दिली. आताच्या पोस्टमधूनही त्यांनी नात्यात प्रेम, विश्वास आणि एकमेकांची काळजी यांनाच महत्त्व आहे, हे अधोरेखित केलं आहे.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ