स्तनाच्या कर्करोगावर मात केलेल्या ५५ जणींचा मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्टमध्ये सन्मान
वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने जनजागृती कार्यक्रमात ३० ते ८० वयोगटातील ५५ महिलांच्या जिद्दीचा आणि धैर्याचा गौरव केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मुंबई सेंट्रलमधील वॉकहार्ट हॉस्पिटल्सने सोमवारी स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्तनाच्या कर्करोगावर मात केलेल्या ५५ महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. या महिला ३० ते ८० वयोगटातील आहेत. त्यांच्या जिद्दीचा आणि धैर्याचा सन्मान हा या उपक्रमाचा गाभा होता.
कर्करोगाचे लवकर निदान, वेळेवर उपचार आणि संपूर्ण उपचारप्रवासात मिळणारा भावनिक आधार किती महत्त्वाचा आहे, यावरही कार्यक्रमात भर देण्यात आला. स्तनाच्या कर्करोगावर मात केलेल्या महिला एकत्र आल्या, त्यांनी आपल्या प्रवासाचा आनंद साजरा केला. भारतात सार्वजनिक आरोग्यासमोर मोठे आव्हान ठरत असलेल्या या आजाराबद्दल अधिकाधिक जनजागृती व्हावी, असा संदेशही त्यांनी दिला.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये राज्यसभेत राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाचा (NCRP) अंदाज सादर केला. त्यानुसार २०२५ मध्ये भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची २,४०,३८१ प्रकरणे नोंदवली जाण्याचा अंदाज होता. त्यात महाराष्ट्रातील २१,८४३ प्रकरणे होती. त्याच वर्षी देशात या आजाराने महिलांच्या मृत्यूंची अंदाजित संख्या १,०३,३६३ होती. जनजागृती, वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि योग्य उपचार मिळणे किती गरजेचे आहे, हेच हे आकडे दाखवतात.
वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलच्या कन्सल्टंट ऑन्कोसर्जन डॉ. मेघल संघवी म्हणाल्या, "स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता म्हणजे हा आजार आहे एवढे जाणून घेणे नव्हे. शरीरातील बदल ओळखणे आणि उशीर न करता वैद्यकीय सल्ला घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्तनात गाठ जाणवणे, आकार किंवा स्वरूपात बदल होणे, त्वचेवर खळगा पडणे, स्तनाग्रांमध्ये बदल होणे किंवा असामान्य स्राव दिसणे याकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबात या आजाराचा पूर्वेतिहास नसलेल्या महिलांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, हे समजून घेणे आवश्यक आहे."
डॉ. संघवी पुढे म्हणाल्या, "वेळेवर तपासणी केल्यास निदान होते आणि योग्य वेळी उपचार सुरू करता येतात. महिलांनी आपल्या स्तनांच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, आरोग्याच्या चिंता सांगताना संकोच करू नये आणि आपले वय व वैयक्तिक जोखीम लक्षात घेऊन तपासणीच्या शिफारशींचे पालन करावे, असे आम्ही आवाहन करतो."
वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे रिजनल बिझनेस हेड इंडिया आणि ग्रुप हेड इंटरनॅशनल बिझनेस डॉ. वीरेंद्र चौहान म्हणाले, "स्तनाच्या कर्करोगाचा प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येक निदानामागे एक व्यक्ती असते, जी अनिश्चितता, कठीण निर्णय आणि उपचारांदरम्यान येणाऱ्या भावनिक आव्हानांना तोंड देत असते. या उपक्रमातून आम्हाला या ५५ महिलांच्या धैर्याचा सन्मान करायचा होता आणि रुग्णालयाच्या पलीकडेही त्यांच्या प्रवासातली जिद्द साजरी करायची होती."
चौहान यांनी पुढे सांगितले, "वैद्यकीय उपचार महत्त्वाची भूमिका बजावतातच, पण भावनिक आधार, प्रियजनांकडून मिळणारे प्रोत्साहन आणि संवेदनशीलतेने दिली जाणारी आरोग्यसेवा रुग्णांना या टप्प्यातून पुढे जाण्यासाठी तितकीच महत्त्वाची असते. या महिलांच्या कथा इतरांना वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्याची, स्तनाच्या कर्करोगाविषयी मोकळेपणाने बोलण्याची आणि या प्रवासात कोणालाही एकट्याने सामना करावा लागू नये हे समजून घेण्याची प्रेरणा देतील, अशी आम्हाला आशा आहे."
या उपक्रमातून वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. वेळेवर वैद्यकीय सल्ला, योग्य तपासण्या आणि रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना भावनिक आधार यांचे महत्त्व अधोरेखित झाले. जनजागृती, वेळेवर कृती आणि संवेदनशील आरोग्यसेवा यांमुळे स्तनाच्या कर्करोगाविरुद्धच्या प्रवासात महत्त्वपूर्ण बदल घडू शकतो, असा संदेश या ५५ महिलांच्या गौरवातून देण्यात आला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.