शनिवार, 7 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पिंपळे गुरवच्या कचऱ्यातील पायांचे गूढ उलगडले; पोलिसांच्या तपासात विष्णू कुंभारचे नाव समोर

पिंपळे गुरवच्या कचऱ्यातील पायांचे गूढ उलगडले; पोलिसांच्या तपासात विष्णू कुंभारचे नाव समोर छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे कचऱ्यात सापडलेले दोन पाय अनिल खाडे (वय ५०) यांचे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. सिम कार्डच्या कव्हरवरील नंबरवरून पोलीस ठेकेदारापर्यंत पोहोचले.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे कचऱ्यात सापडलेल्या पुरुषाच्या दोन पायांचे गूढ पोलिसांनी प्राथमिक तपासात उलगडल्याचे सांगितले आहे. मृत व्यक्तीचे नाव अनिल खाडे (वय ५०) आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विष्णू कुंभार याने दारूच्या नशेत झालेल्या वादातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी (६ नोव्हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास काटेपुरम चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय रोडवरील श्रीनगर गल्ली क्रमांक तीन येथे रस्त्याच्या कडेला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कचऱ्यात पुरुषाचे दोन पाय आढळले. त्यानंतर सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी पोहोचली.

सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पिंपळे गुरव येथील गल्ली क्रमांक तीनमध्ये उघड्यावर कचरा टाकला जातो आणि महापालिकेचे कर्मचारी तो घंटागाडीवरून रोज उचलून नेतात. त्या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पुरुषाचे पाय मिळाल्याचा कॉल ११२ वर आला. पोलिसांचा स्टाफ लगेच गेला आणि कोळीही तिथे गेले. महापालिकेचे कर्मचारी कचरा काढत होते आणि त्यांना प्लास्टिकच्या गोणीत ते दोन पाय सापडले होते. गुडघ्यापासून खालचे ते पाय पुरुषाचे असल्याचे पहिल्या नजरेत दिसत होते.

आसपास आणखी एखादी बॉडी किंवा इतर अवयव टाकलेले आहेत का, हे पाहण्यासाठी पोलिसांनी डॉग स्कॉडलाही बोलावले होते. मात्र काही सापडले नाही. त्यानंतर पोलिसांनी ती गोणी बारकाईने तपासली, तेव्हा त्यात सिम कार्डचा मोठा चौकोनी भाग मिळाला आणि त्यावर एक मोबाईल नंबर होता. त्या नंबरवर संपर्क केला असता तो एका ठेकेदाराचा निघाला. ठेकेदाराला बोलावून विचारले, तेव्हा कार्ड त्याच्याच नावावर होते. ते कार्ड आपण आपल्या वर्करला, म्हणजे अनिल खाडे याला दिले होते, असे त्याने सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी खाडे यांचा शोध सुरू केला. त्यांची पत्नी आणि मुलगा पोलिसांना भेटले. पोलिसांनी फोटो दाखवले, पण पहिल्या नजरेत त्यांना ते पाय ओळखता आले नाहीत. कारण खाडे गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत नव्हते आणि इकडे तिकडे फिरत असत. मुलाच्या मोबाईलमध्ये एक फोटो होता, त्यात खाडे दारू पिऊन पडलेले होते आणि त्यांचे पाय स्पष्ट दिसत होते. तो फोटो आणि सापडलेले पाय पोलिसांनी जुळवून पाहिले, तेव्हा ते ८० टक्के मिळतेजुळते होते.

मग पोलिसांनी खाडे यांच्या मित्रांचा शोध घेतला. एका मित्राने सांगितले की खाडे हे पिंट्याबरोबर, म्हणजे विष्णू उर्फ पिंट्या कुंभार याच्याबरोबर जास्त असत. पोलिसांनी कुंभारचे घर शोधले. घराजवळ गेल्यावर स्टाफला दुर्गंधी येऊ लागली. खिडकीच्या फटीतून पाहिले तेव्हा आत काहीतरी बॉडीसारखे पडलेले दिसले. कुलूप काढून आत गेल्यावर बॉडी सापडली आणि तिचे दोन्ही पाय कापलेले होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बॉडीच्या डोक्यावर मोठी जखम दिसली. म्हणजे आधी डोक्यात मारले असावे आणि नंतर कोयत्याने व लोखंडी स्टिकने मारलेले दिसते. पोलिसांनी सांगितले की दोघेही दारूचे व्यसनी होते आणि दारू प्यायला बसले असताना दारूवरून त्यांचे भांडण झाले असावे, त्यातून हे घडलेले दिसते.

प्राथमिक तपासानुसार, अनिल खाडे आणि विष्णू कुंभार यांच्यात दारूच्या नशेत बाचाबाची झाली होती. त्या वादातून कुंभार याने खाडे यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून धड आणि पाय वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचे तपासात उघड झाले आहे. धड नवी सांगवीतील विनायकनगर गल्ली क्रमांक एक येथील घरात टाकलेले होते, तर दोन पाय श्रीनगर गल्ली क्रमांक तीनसमोर टाकले होते.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ