शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

लंडनहून परतलेली मुग्धा देशमुख पुण्यातील गहुंजे येथील फ्लॅटमध्ये मृत आढळली

लंडनहून परतलेली मुग्धा देशमुख पुण्यातील गहुंजे येथील फ्लॅटमध्ये मृत आढळली छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य शहर अभियंता अविनाश देशमुख यांची मुलगी मुग्धा देशमुख पुण्यातील गहुंजे येथे एका फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली. ती लोढा बेलमोंडो या आलिशान सोसायटीत राहत होती. उच्चशिक्षणासाठी लंडनला गेलेली मुग्धा भारतात आणि तेही पुण्यात आली होती, पण ही गोष्ट तिने आपल्या कुटुंबापासून लपवून ठेवली होती.

मुग्धा जुलै 2025 मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. तिथे गेल्यापासून ती घरच्यांच्या सतत संपर्कात होती. 23 ऑक्टोबर 2026 रोजी तिचे आईशी शेवटचे बोलणे झाले. त्या कॉलमध्ये "मी मुलाखतीसाठी जात आहे," असे तिने आईला सांगितले. त्यानंतर मात्र कुटुंबाचा तिच्याशी संपर्कच झाला नाही. घरच्यांनी अनेकदा फोन लावला, पण तिचा फोन सतत बंद येत होता.

मुलगी कुठे आहे आणि कशी आहे, याची आईवडिलांना चिंता वाटू लागली. अनेक प्रयत्न करूनही संपर्क होत नव्हता. म्हणून त्यांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की, मुग्धाने ऑगस्ट 2026 मध्येच लंडन सोडले होते. म्हणजे ती दोन महिन्यांपूर्वीच भारतात परतली होती, पण याची कुटुंबाला कुठूनही कल्पना मिळाली नव्हती. मुलगी नक्की कुठे आहे, या काळजीने कुटुंबाने उस्मानपुरा पोलीस स्टेशन गाठले.

तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी मुग्धाचा शोध सुरू केला. तिचे मोबाईल लोकेशन आणि बँक खात्याची तपासणी करण्यात आली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. मुग्धाचे क्रेडिट कार्ड भारतात झोमॅटो, स्विगी यांसारख्या ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्सवर सातत्याने वापरले जात होते. काही तांत्रिक पुराव्यांवरूनही ती भारतातच असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईल लोकेशनच्या मदतीने ती गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून बंद होता. अखेर पोलिसांनी बनावट चावीच्या मदतीने तो उघडला. आत गेल्यावर मुग्धा मृत अवस्थेत दिसली. फ्लॅटमध्ये एसी आणि पंखाही सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मुग्धाच्या आजूबाजूला काही औषधे मिळून आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आणखी एक गोष्ट समोर आली आहे. 21 ऑक्टोबर रोजीच मुग्धाने आपल्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीला काम बंद करायला सांगितले होते. तिला भारतात येऊन काही महिने झाले होते, तरीही याबद्दल तिने कुटुंबाला कोणतीही माहिती दिली नव्हती.

#पुणे#जुर्म#PT24#Crime#Pune

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ