मंगळवार, 3 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

मुंबईत मॅरिटाइम इंडिया परिषद सुरू; बंदर क्षेत्रात ७६ हजार कोटींचे करार, राणेंची गुंतवणुकीची हाक

व्यवसाय PT24 टीम

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी फिक्कीच्या परिषदेत जागतिक गुंतवणूकदारांना महाराष्ट्रातील बंदर, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात उद्योग उभारण्याचे आवाहन केले.

मुंबई : बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात या क्षेत्रांत महाराष्ट्र आपली क्षमता जागतिक पातळीवर वाढवण्याच्या दिशेने निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू असल्याचे सांगत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जागतिक गुंतवणूकदारांना राज्यात येऊन उद्योग उभारण्याचे आवाहन केले. जागतिक सागरी अर्थव्यवस्थेत भारत जी प्रगती करत आहे, तिचे भागीदार व्हा, असेही ते म्हणाले. फिक्कीच्या व्यासपीठावरून त्यांनी हे आवाहन केले.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्कीतर्फे ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. गोरेगाव येथील नेस्को केंद्रात २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही परिषद होत आहे. तिचे उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्राच्या बंदर आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी, पायाभूत सुविधांचा विकास आणि या क्षेत्राच्या भविष्यातील योजना यांवर आपली भूमिका मांडली.

कार्यक्रमाला फिक्कीचे अध्यक्ष विजय शंकर, ध्रुव गौतम, कॅप्टन अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे गौरव दयाल, नेदरलॅंडचे जेरीवेल हेल्डन, शिपींग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनेश त्यागी, ओडिशा कॉमर्स आणि वाहतुक विभागाचे प्रधान सचिव एन बी एच राजपुत आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बी उपस्थित होते.

राणे म्हणाले की, महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. नैसर्गिक बंदरे आहेत, औद्योगिक पायाभूत सुविधा मजबूत आहेत आणि निर्यातीसाठी अनुकूल व्यवस्थाही उपलब्ध आहे. यामुळे बंदर उद्योगासाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते, असे ते म्हणाले. राज्यातील मेरिटाइम क्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला चालना दिली जात आहे आणि या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील संधी वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला जात आहे, असे राणे यांनी सांगितले. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 'वन विंडो क्लिअरन्स'सारख्या सुविधांवरही जोर दिला जात असल्याचे ते म्हणाले.

सागरी क्षेत्राला आधुनिक रूप देण्यासाठी मुंबई वॉटर मेट्रोसारख्या जलवाहतुकीच्या नव्या कल्पनांवर भर दिला जात आहे. मुंबई वॉटर मेट्रो ही जगातील सर्वात मोठी जलवाहतूक बनेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला. बंदरांची क्षमता वाढवणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्सचा विस्तार करणे आणि निर्यातीला चालना देणे, यातून महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची नैसर्गिक भौगोलिक ताकद, औद्योगिक क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधा यांची सांगड घालून बंदर आणि मेरिटाइम क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी आणखी व्यापक करण्यावर भर आहे. जागतिक गुंतवणूकदारांनी या संधींचा फायदा घ्यावा आणि बंदर, जहाज बांधणी व दुरुस्ती क्षेत्रात उद्योग उभारावेत, असे आवाहन राणे यांनी केले.

अमृतकाळात भारताची सागरी क्षमता वाढवणे हे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे आणि त्यात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे राणे म्हणाले. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे फक्त उद्योगांचा विस्तार होणार नाही, तर राज्यात रोजगाराच्या नव्या संधीही तयार होतील, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला देशातील आघाडीचे मेरिटाइम आणि सागरी व्यापाराचे केंद्र बनवण्याच्या दिशेने ही परिषद निश्चितच महत्त्वाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

#नागपूर#कारोबार#PT24#Business#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ